देशाच्या विकासात ” इंदिरा पर्व ” महत्त्वाचे – श्रीपाल सबनीस

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील

बँकांचे राष्ट्रीयीकरण, ऑपरेशन ब्लू स्टार सह बांगलादेशाची निर्मिती करणाऱ्या माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी या देशाच्या कणखर नेत्या होत्या. देशाच्या विकासात “इंदिरा पर्व” अत्यंत महत्वाचे असून भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिराजींनी बलिदान दिले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.
            संगमनेरच्या सहकार पंढरीत अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील शक्तीस्थळ बागेत माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे  होते. तर व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सौ.ललिताताई सबनीस, कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, आर.बी.राहणे, नवनाथ आरगडे, सिताराम राऊत, रामदास पा.वाघ, संपतराव गोडगे, विलास वपेॅ, अभिजीत ढोले, मिलिंद कानवडे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते. यावेळी देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
            यावेळी बोलताना साहित्यिक श्रीपाल सबनीस म्हणाले की, इंदिराजींनी धर्मनिरपेक्ष समाजवादी भारताची पायाभरणी केली असून देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचा विसर होणे हा कृतघ्नपणा आहे. देशाच्या विकासात इंदिरा पर्व अत्यंत महत्त्वाचे असून हरितक्रांती, विज्ञान क्रांती, घडवणाऱ्या इंदिराजींनी बँकांच्या राष्ट्रीयकरणासह बांगलादेशाची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कणखर नेत्या म्हणून त्या गौरविल्या गेल्या. व्यक्तिगत जीवनातही अनेक संकटांना झेलत त्या पुढे आल्या. इंदिराजींचे स्मरण हे फक्त काँग्रेसने नव्हे तर संपूर्ण देशाने केले पाहिजे. तसेच देशात ६०० संस्थाने विलगीकरणाचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. इंदिराजी व सरदार पटेल हे भारतीय निष्ठेचे प्रतीक असल्याचेही ते यावेेेेळी म्हणाले.मात्र सध्या दुर्दैवाने देशात धार्मिकतेचे राजकारण सुरू आहे. लोकशाही ही धार्मिकतेवर आधारित नसून सर्वधर्मसमभावावर आधारित आहे. धार्मिकतेचे राजकारण हे देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवणारे असल्याचे ते म्हणाले.
             आमदार डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी जीवनात इंदिरा गांधी, सुभाषचंद्र बोस यांसह विविध राष्ट्रपुरुषांना आदर्श मानले. त्यांच्या प्रती कृतज्ञता असावी आणि त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे म्हणून अमृत उद्योग समूहात त्यांचे स्मारक उभे केले आहे. दिल्लीनंतर संगमनेर येथील शक्तिस्थळ हे येथील कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देत असते. समाजमनाच्या विकासाचा विचार मांडणाऱ्या इंदिराजींना शतकातील सर्वात कणखर नेतृत्व म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवले गेले असल्याचे ते म्हणाले.यावेळी विलास कवडे, शांताराम कढणे,  विनोद हासे, मोहनराव करंजकर, तात्या कुटे, सौ अर्चनाताई बालोडे, सौ निर्मलाताई गुंजाळ, बाळासाहेब गायकवाड, निखिल पापडेजा, ऋतिक पावसे, शेखर सोसे आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर रामदास पा. वाघ यांनी आभार मानले.

चौकट :- आमदार थोरात यांनी निष्ठेची परंपरा जपली.
राष्ट्रीय पुरुष आणि देशाप्रती निष्ठा बाळगणारे स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेतेे तथा राज्याचेे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पक्षाप्रती कायम निष्ठा जपली असून या राष्ट्रपुरुषांचे विचार जपण्यासाठी निर्माण केलेली शक्ती स्थळे ही सर्वांसाठी आदर्शवत असल्याचे श्रीपाल सबनीस यावेळी म्हणाले.

चौकट :- भारत जोडो यात्रा ही भारतीयांची मने जोडणारी
काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून स्व.इंदिरा गांधी, स्व.राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान दिले आहे. खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही लोकशाहीचा विचार व भारतीयांचे मने जोडणारी  यात्रा असून या यात्रेचे राज्यातील नियोजन काँग्रेसचे वरिष्ठ नेते  आमदार बाळासाहेब थोरातांवर असून त्यांच्या नेतृत्वाखाली इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे.  यामध्ये  लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या पक्ष, संघटना सहभागी होत  असल्याचा विश्वास श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here