उरण दि 5(विठ्ठल ममताबादे)विजयादशमी निमित्ताने प्रत्येक जण आपले घर, परिसर स्वच्छ करतच असतो पण गडकिल्ले कोण स्वच्छ करणार ? ही सर्वांची जबाबदारी आहे. एकेकाळी प्रत्येक गडावर प्रत्येक सण हा साजरा केला जायचा. आणि त्याच अनुषंगाने सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा द्रोणागिरी गडावर दसरा सण हा मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला. सदर उत्सव साजरा करण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठान- उरण विभाग यांच्यासोबत शिवराज युवा प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान तसेच बोरिवली वरून आलेल्या काही शिवभक्तांनी विशेष मेहनत घेतली तसेच जल्लोषात द्रोणागिरी किल्ल्यावर दसरा सण साजरा केला.
मोठया संख्येने उपस्थित राहिलेल्या शिवभक्तांनी प्रथमतः गडाची साफसफाई केली. गडाला तोरण बांधून गणपती बाप्पाचे पूजन करण्यात आले.नंतर द्रोणागिरी गडाचा महादरवाजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच गड पूजन केल्यानंतर गडावर भगवा ध्वज फडकविण्यात आला.