धूतूम ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला आले यश.

0

मागण्या मान्य झाल्याने उपोषणाची यशस्वी सांगता.

उरण  दि २९(विठ्ठल ममताबादे )

उरण तालुक्यातील धूतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या इंडीयन ऑईल टँकिंग अर्थात इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स या कंपनीत गेल्या २५ वर्षात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून न घेता सतत परप्रांतियांना नोकरीत स्थान दिल्याने स्थानिक भूमिपुत्र अजूनही बेरोजगार राहिला होता .अनेकवेळा पत्रव्यवहार करून देखील कंपनी प्रशासन दाद देत नव्हती. त्यामुळे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला. सदर कंपनी प्रशासनाने स्थानिक तरुणांना तत्काळ रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसाठी कंपनी विरोधात २० नोव्हेंबर पासून धुतुम ग्रामपंचायत व ग्रामस्थांतर्फे आमरण उपोषण सुरु झाले होते.बेरोजगारांच्या समस्यावर कंपनी प्रशासन, पोलीस प्रशासन व उपोषण कर्ते यांच्यात ३ वेळा बैठकी झाल्या मात्र त्या असफल ठरल्या.दि २८ नोव्हेंबर २०२३ रोजी आंदोलनाचा नववा दिवस होता.उपोषण कर्त्यांनी आमरण अधिक तीव्र केल्याने कंपनी प्रशासनाला उपोषण कर्त्यांपुढे नमते घ्यावे लागले. उपोषण कर्त्यांचे आक्रमक भूमिका पाहता दिनांक २८/११/२०२३ रोजी संध्याकाळी ७ वाजता आयओटीएल कंपनीत बैठक संपन्न झाली.या बैठकीत उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश निकम, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, आयओटीएल कंपनी प्रशासनाचे एचआर संदीप काळे,टर्मिनल हेड भूपेश शर्मा, कंपनीचे एकझूकूटिव्ह ऑफिसर सिद्धार्थ एडके,अधिकारी सतीश म्हात्रे, कॉन्ट्रॅक्टर विलास ठाकूर, अविनाश ठाकूर,धुतुम ग्रामपंचायतचे सदस्य प्रेमनाथ ठाकूर, माजी सरपंच शंकर ठाकूर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत ६ जानेवारी २०२४ पासून प्रथम १० प्रकल्पग्रस्तांची भरती करण्याचे प्रथमतः मान्य करून उर्वरित प्रकल्पग्रस्तांची भरती प्रक्रिया टप्प्या टप्प्याने करण्यात येणार असल्याचे कंपनी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. उपोषण कर्त्यांचे या बैठकीत मागण्या मान्य झाल्याने उपोषण कर्त्यांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सरबत पाजवून उपोषणाची सांगता केली.

१९९७ साली धुतूम ग्रामपंचायत हद्दीमध्ये इंडीयन ऑईल टँकिंग ही कंपनी सुरू झाली.या कंपनीसाठी सुमारे ८५ शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी संपादित झाल्या.या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कंपनीच्या नोकर भरतीत सामावून घेण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.मात्र  गेल्या २५ वर्षांत गावातील फक्त तिघांना कंपनीच्या मुख्य कर्मचाऱ्यांत सामावून घेण्यात आले असून बहुतेक कामगार भरती परराज्यातून करण्यात आली.विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब गेल्या २५ वर्षात कोणीच विचारला नाही. मात्र सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी सरपंच पदाचा कारभार सुरू करताच आय ओ.टी.एल कंपनीच्या बेलगाम कारभारा  विरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.व शेवटी सर्वांना न्याय मिळवून दिला.सतत ९ दिवस आमरण उपोषण करून लढा यशस्वी केल्याने या सर्व उपोषण कर्त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.उपोषण यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थ, धुतुम ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या सर्वांचे धुतुम ग्रामपंचायतचे सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी तसेच धुतुम ग्रामपंचायतने आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here