नको देवराया अंत आता पाहू..! जगाचा पोशिंदा संकटात ; मायबाप सरकार मात्र झोपेत !

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील

गेल्या १५ दिवसापासून वरूणराजाची वक्रदृष्टी झाल्याची प्रचिती जिल्ह्यातील बळीराजाला येत आहे. परिणामी अखंडीत पडणाऱ्या पावसाने बळीराजाचे अक्षरशः कंबरडे मोडले असून शेतात असणारी उभी पिके डोळ्यादेखत सडून गेली आहेत. तरीही वरूणराजा थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा भयंकर संकटात सापडला असताना मायबाप सरकार मात्र झोपेचे सोंग घेऊन शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेत आहे.त्यामुळे आता “नको देवराया अंत आता पाहू” असे म्हणण्याची वेळ जगाच्या पोशिंदावर आली आहे.

          गत पंधरा दिवसापासून जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे. वरूणराजा थांबायचे नाव घेत नसल्याने बळीराजाच्या शेतात आणि शेती पिकात पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतात उभी असणारी खरिपाचे पिके अर्थात कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर, सोयाबीन आदी पिकांबरोबरच ऊस, घास, कडवळ, खोंड्या आदी पिंकाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे एैन सणासुदीत शेतजमिनीसह शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात दैना झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इतर पिकाप्रमाणेच दूध धंद्याचा मोठा आधार वाटतो मात्र सद्यस्थितीत सुरू असणाऱ्या जोरदार पावसाने जनावरांसाठी आवश्यक  असणाऱ्या चाऱ्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घास, मका, कडवळ जास्त पाण्याने सडून गेल्याने येत्या काही दिवसात बळीराजासमोर जनावरांच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मुसळधार झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांच्या शेतात असणाऱ्या विहिरी पडल्या आहेत. पाऊस उघडत नसल्याने जमिनीची वापसा लांबणीवर पडणार असल्याने जमिनीची नांगरट करणे जिकरीचे झाल्याने दिवाळीनंतर अर्थात हिवाळ्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या पिकांचा पेरणी हंगाम सुरू होतो तो रब्बीचा हंगाम यंदा लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याचा दुष्परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. सद्यस्थितीत खरिपाची असणारी पिके पूर्णतः सोडून गेल्याने ती बाजारपेठेत नेण्यालायक नसल्याने शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. बळीराजा दररोजच मायबाप सरकारच्या घोषणाकडे लक्ष ठेवून आहेत. दिवाळीपूर्वी सरसकट सर्व शेतकऱ्यांना आर्थिक भरीव मदत मिळेल या भाबड्या आशेवर तो दररोज आलेला दिवस ढकलत आहे. त्याचे दुःख जाणून घ्यायला सरकारला आणि सरकारच्या मंत्र्यांना वेळ नाही. सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना पगार आणि बोनसच्या रूपात राज्य सरकारने गुलाब जामुन खाऊ घातले असले तरी जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला केवळ पंचनामे करणार असल्याचे चॉकलेट दिले जात आहे. अंधार जाऊन प्रकाश पडावा, सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा सण समजल्या जाणाऱ्या दीपोत्सव अर्थात दिवाळीत बळीराजाच्या जीवनात कडेकोट अंधार निर्माण झाला असून त्याचे दिवाळे निघाले असून शेतकरी वर्ग देशोधडीला लागला असताना त्याला तातडीने मदत व आधार देण्याची नितांत गरज असताना राज्य सरकार आणि सरकार मधील मंत्री फक्त पंचनामे करण्याच्या गप्पा गोष्टी करून बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत.दिवाळीपूर्वी मायबाप सरकार कडुन मदत मिळेल अशी आशा बळीराजाला होती. मात्र सरकारकडून अजूनही सरसकट मदतीची घोषणा होत नसल्याने “नको देवराया अंत आता पाहू” असे म्हणण्याची वेळ जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजावर आली असताना मायबाप सरकार मात्र  सोंग घेऊन झोपले आहे. यासाठी सरसकट शेती पिकांचे व पावसाने झालेल्या इतर नुकसानीचे पंचनामे करून भरीव मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here