नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यांमुळे बनला मृत्यूचा सापळा; 

0

महामार्गाने 8 महिन्यांत 43 जणांचा घेतला बळी  ; महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले, अनेकांचे संसार उघड्यावर पडले, 45 जणांचे अवयव निकामी

 

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे 

             राज्याचा प्रमुख मार्ग म्हणून गणल्या जाणाऱ्या नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे मृत्यूचा सापळा बनला आहे. अपघात नित्याने घडत असल्याने बळींची संख्या वाढतच आहे. नगर- मनमाड रस्त्यावर शनिशिंगणापूर फाट्यावरील  खड्याने दत्तात्रय अशोक लांबे (वय 26) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, राहुरीत 13 दिवसांच्या कालावधीत हा चौथा अपघाताचा बळी ठरला आहे. गेल्या आठ महिन्यांत या राष्ट्रीय महामार्गाच्या राहुरी हद्दीत तब्बल 43 जणांचा बळी गेला तर 45 जण जखमी होवून अवयव निकामी झाले आहे.या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना संताप व्यक्त केला जात आहे.

                 

चालक अशोक लांबे यांचा मुलगा दत्तात्रय हा बुधवारी (दि. १४) रात्री ८.३० वाजेच्या सुमारास डिग्रस येथे मित्राला सोडण्यास गेला होता. तो घरी परतत असताना नगरमनमाड महामार्गावरील शनिशिंगणापूर फाट्या समोरील खड्ड्याने बळी घेतला आहे. या खड्ड्यात अडखळत तो दुचाकीसह कोसळला. दत्तात्रय लांबे याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यास तत्काळ प्रवाशी व व्यावसायिकांनी नगरला हलविले. मात्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले.

           <p> दरम्यान, गेल्या १३ दिवसांमध्ये दत्तात्रय लांबेसंह चौघांचा राहुरी हद्दीत बळी गेला. या तरूणाच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, दोन चुलते, चुलती, तीन चुलत बंधू असा परिवार आहे. नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. शेकडो कुटुंबांना उद्ध्वस्त करणारे खड्डे नगर मनमाड रस्त्यावर पडले आहे. कोट्यवधी रूपये निधी दिल्याच्या घोषणा केल्या जातात. माती, दगडं व नाममात्र डांबर ओतून या रस्त्याला कोट्यवधी रूपयांचा खर्च केल्याचा आव आणला जात आहे. ठेकेदाराने रस्त्यावर खोदकाम करून सुरू केलेले काम थांबविले मशिनरी जैसे थे सोडून पळ काढला. पूर्वीच खराब झालेला रस्ता शिंदे नामक ठेकेदाराने सुधारणा करण्या ऐवजी रस्ता उद्ध्वस्त केला. या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी दुसऱ्या शिंदे नामक ठेकेदाराची नेमणूक झाली. भर पावसामध्ये दुरूस्ती सुरू असल्याने पुढचा पाठ, मागचा सपाट, या पद्धतीने काम सुरू आहे. दुरूस्ती होताच बुजविलेल्या खड्ड्यांचा आकार वाढून हा रस्ता अक्राळ-विक्राळ होत आहे. त्यातच वाहनांचा तोल हुकल्यास छोटे- मोठे अपघात घडत आहेत. परिणामी राहुरी परिसरामध्ये नगर मनमाड रस्त्यावर अवघ्या 8 महिन्यांत 43 जणांच्या रक्ताचा सडा वाहिला, तर 45 जणांचे अवयव निकामी होऊन त्यांना अपंगत्व स्वीकारावे लागल्याची गंभीर बाब पोलिस डायरीत नमूद आहे.

चौकट

  जिल्हाधिकाऱ्यांनाच घेराव घालू 

             राष्ट्रीय महामार्ग नगर-मनमाड बाबत प्रशासनाने गेंड्याचे कातडे पांघरले आहे. किती महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले जाणार, किती जणांचे संसार उघड्यावर येणार, याचे कोणालाही घेणे-देणे नाही. नेते फक्त मते मिळविण्यात, आरोप प्रत्यारोपात दंग आहेत. आता तरुणांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालून हे काम होणार का, असा प्रश्न विचारण्यासाठी तरूणांची रॅली काढणार आहोत, अशी माहिती नगर-मनमाड रस्ता कृती समितीचे देवेंद्र लांबे व वसंत कदम यांनी दिली.

अभियंता दिनाची अशीही खिल्ली..!

           जागतिक अभियंता दिनानिमित्त आज अभिनंदन करताना नगर-मनमाड रस्ता तयार करणाऱ्या व दुरुस्ती करणाऱ्या अभियंता पदावरील व्यक्तींचा विशेष उल्लेख होत होता. नगर-मनमाड रस्त्यासंदर्भात सर्व अभियंता पदावरील व्यक्तींना वगळून अभियंता दिनानिमित्त शुभेच्छा संदेश व्हायरल करून, नगर-मनमाड रस्त्याची खिल्ली उडविली जात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here