नवीन भाडेकरूची शासनामार्फत ओळख परेड करावी – कैलासशेठ वाकचौरे यांची निवेदनाद्वारे मागणी

0

नवीन भाडेकरूची शासनामार्फत ओळख परेड करावी – कैलासशेठ वाकचौरे यांची निवेदनाद्वारे मागणी

संगमनेर : शहरात नव्याने राहण्यास येणाऱ्या सर्व नवीन भाडेकरूनची शासनामार्फत ओळख परेड करण्यात यावी अशी मागणी संगमनेर तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक कैलासशेठ वाकचौरे यांनी संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

           उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना दिलेल्या निवेदनात कैलासशेठ वाकचौरे यांनी पुढे असे म्हटले आहे की शहरातील घरमालकांनी बाहेरील व परप्रांतीय लोकांना घर भाड्याने देताना त्यांचे ओळखपत्र व माहिती संगमनेर नगरपालिका आणि पोलीस ठाण्यात द्यावी. संगमनेर परिसरात व शहरातील उपनगरात दररोज नवनवीन लोक पहावयास मिळत असतात. यात परप्रांतीय लोकांच्या भरणा अधिक असतो. त्यामुळे शहरात आरोग्याच्या प्रश्नांबरोबर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची दाट शक्यता असून विशेषता परप्रांतीय लोकांची त्यांच्या गावाकडची पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे येथे माहीत नसते. रात्री, अपरात्री लोकांना धमकावणे, त्रास देणे, लूट करणे असे प्रकार सध्या शहरात व शहराच्या उपनगरात सध्या घडत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी शहरात राहण्यास येणाऱ्या नागरिकांचे ओळखपत्र तपासून त्यांची छाननी करून खातरजमा करावी अशी मागणी देखील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक कैलासशेठ वाकचौरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. या निवेदनावर अॅड. दिलीप साळगट, भैय्या तांबोळी, समीर ओझा, कृष्णा केसेकर, श्री.घोलप आदींच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here