नायगाव ते मांढरदेव रस्त्याला मिळणार हिरवा कंदील…, खंडाळा तालुकावासियांचे स्वप्न होणार पूर्ण , 

0

जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रयत्नांना यश

खंडाळा : खंडाळा तालुक्यातून मांढरदेवला जाणारा रस्ता व्हावा ही गेल्या चाळीस वर्षांची तालुका वासियांची अपेक्षा होती . गेल्या कित्येक वर्षात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली . अनेकांनी यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली . मात्र हे तालुक्याचं स्वप्न अधुरचं राहिलं होतं . मात्र शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी नव्याने या रस्त्याला मंजूरी  घेण्याची शिकस्त केली असल्याने तालुका वासियांचे स्वप्न पूर्ण होऊन काळू आईच दर्शन सुलभ होणार आहे .
        तालुक्यातील नायगाव पासून मांढरदेवी पर्यंत नवा मार्ग बनविण्यात यावा ही पहिली मागणी तत्कालीन सभापती लक्ष्मणराव भरगुडे पाटील यांनी केली होती . त्यानंतर या रस्त्याचा आराखडाही तयार करण्यात आला . त्याला राज्य शासनाची मंजूरी सुध्दा मिळाली मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने रस्ता झाला नाही . या रस्त्याच्या प्रलोभनावर पुढे चाळीस वर्ष राजकारण झाले . मात्र प्रत्यक्षात रस्ता झाला नाही . त्यामुळे तालुका वासियांचे हे स्वप्न अधुरचं राहिलं होतं .
      नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारपुढे या रस्त्याच्या मंजूरीचा विषय जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी पुन्हा मांडला . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सुमारे चाळीस कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याला निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे . त्यामुळे चेतनाभूमी नायगावचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळ ते मांढरदेवी काळूबाईचे शक्तीस्थळ असा नवा मार्ग अस्तित्वात येणार असल्याने पर्यटनालाही चालना मिळेल .

॥ एक रस्त्याने जोडणार दोन पर्यटनस्थळे ….
आदय स्त्री समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ते महाराष्ट्राची कुलदेवता काळूबाईचे अधिष्ठान मांढरदेव हे एकाच रस्त्याने जोडण्याचा प्रस्ताव शासन दरबारी होता . या रस्त्याच्या मंजूरीचा प्रश्न मार्गी लागला आहे .  त्यामुळे राज्यातील पर्यटकांना एकाच वेळी नायगावचे विचारपीठ आणि मांढरदेवचे शक्तीपीठ पाहता येणार आहे .
स्त्री शिक्षणाचा पाया रचनाऱ्या व सामाजिक क्रांती घडवून समतेचा संदेश देशाला देणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ही महाराष्ट्राची चेतनाभूमी आहे . तर मांढरदेव येथील कुलदैवत माता काळूबाई हे भक्तांसाठी जागरूक अधिष्ठान आहे . नायगावचे हे विचारपीठ आणि मांढरदेवचे शक्तीपीठ एकाच मार्गाने जोडावे यासाठी सुरु असलेल्या संघर्षाला यश मिळाले आहे . त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो पर्यटकांना ही दोन्ही ठिकाणे एकाच वेळी पाहता येणार आहे . ॥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here