चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्यासोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावावा अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. त्यानंतर भारतीय नोटांवर कोणाचा फोटो असावा यावरून सध्या चर्चा रंगली आहे. यासंदर्भात आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. परंतु महाराष्ट्रात यावरून आता राजकारण होताना दिसत आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मुद्द्यावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. 25 पैशांच्या नाण्यावर राणेंचा फोटो लावून ‘हे नाणं फायनल करा’ अशी मागणी सोशल मीडियावर काही जणांकडून करण्यात आली. या प्रकारानंतर आता भाजपाने कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित फोटो कोणी बनवला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. ‘नारायण राणेंचा फोटो अशोकस्तंभाच्या जागी लावून अशोकस्तंभाची विटंबना करण्यात आली आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिलं आहे. गुन्हा दाखल व्हायची प्रोसेस सुरू आहे. यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आम्ही केली आहे,’ असं भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.
न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.