संगमनेर : पदवीधर बेरोजगार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीी, डॉक्टर, वकील यांसह विविध आस्थापनांमध्ये काम करणारे शासकीय बिन शासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ.डॉ सुधीर तांबे यांना राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टिडीएफ ) ने आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) च्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पुणे विद्यार्थी गृह येथे टीडीएफचे प्रदेश अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या बैठकीत फेब्रुवारी २३ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नासिक विभाग पदवीधर संघातून विद्यमान आमंदार डॉ. सुधीर तांबे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला.टीडीएफचे राज्य कार्यवाह हिरालाल पगडाल यांनी आ.डॉ. तांबे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेवून, महाराष्ट्र टीडीएफने नासिक विभाग पदवीधर मतदार संघातून डॉ.सुधीर तांबे यांची उमेदवारी पुरस्कृत करावी असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ माजी आमदार नानासाहेब बोरस्ते(नाशिक), संजय पवार (धुळे), राजेंद्र लांडे (अहमदनगर), भाऊसाहेब बाविस्कर (जळगाव), सुधीर काळे (नगर महानगर), जी के थोरात ( पुणे), आदींनी भाषणे करून प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली.या वेळी बोलताना धुळे टीडीएफचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी डॉ.तांबे यांनी टीडीएफच्या पाठिंब्यावर तीन वेळा विजय मिळविला असून चौथ्या वेळी देखील ते प्रचंड मताधिक्याने विजयी होतील अशी खात्री व्यक्त केली. या निवडणुकीत मतदार नोंदणी महत्वाची असते, सत्ताधारी पक्ष त्यात अनेक अडथळे आणण्याची शक्यता आहे, त्यामुळे टीडीएफ कार्यकर्त्यांनी गाफील न राहता, नेहमी प्रमाणे टीडीएफसमर्थक पदवीधरांची मतदार नोंदणी बिनचूक आणि काळजीपूर्वक करावी असे आवाहन केले.माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी आ.सुधीर तांबे यांनी गेल्या दीड दशकात शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील सोडवलेल्या प्रश्नांचा आढावा घेतला, डॉ. तांबे यांनी शिक्षक व पदवीधर मतदारांशी सर्वदूर संपर्क ठेवलेला आहे, शिक्षक आणि पदवीधर यांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे,त्यामुळे आगामी निवडणूकीत त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.त्यानंतर टीडीएफचे अध्यक्ष विजय बहाळकर यांनी टाळ्यांचा गजरात डॉ.सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली. यावेळी बोलतांना ते म्हणाले लोकशाही, समाजवाद, विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता आणि नियोजन ही मूल्ये कधी नव्हे ती आज अडचणीत आली आहेत,डॉ. तांबे यांनी या मूल्यांच्या रक्षणासाठी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळेच टीडीएफ त्यांना लागोपाठ चौथ्यावेळी उमेदवारी बहाल करीत आहे. ते निवडून येतील आणि त्यासाठी टीडीएफचे राज्यभरातील कार्यकर्ते कठोर परिश्रम करतील.त्यानंतर आ.डॉ.सुधीर तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, ते म्हणाले टीडीएफ सातत्याने माझ्या पाठीशी उभी राहत आली आहे, त्यामुळे मी टीडीएफचाच एक घटक आहे. दिवंगत आमदार आ.शिवाजीराव दादा पाटील यांनी आणि माजी आमदार कै. जे.यू .नाना ठाकरे यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले,हजारो टीडीएफ कार्यकर्त्यांचा सातत्याने भक्कम पाठिंबा मिळाला, त्यामुळेच गेल्या तीन निवडणुकीत आपण प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. यावेळी देखील टीडीएफने मला पुन्हा पुरस्कृत करून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना असून आगामी काळात शिक्षण आणि शिक्षक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील. या वेळी टीडीएफ चे उपाध्यक्ष हनुमंतराव भोसले, के एम ढोमसे, अरविंद कडलग, डी. जे.मराठे,सागर पाटील मुरलीधर मांजरे दत्तराज सोनावळे, किशोर जाधव, शिवाजी कामथे, सुशांत कविस्कर यांच्यासह टीडीएफ चे सर्व विभाग सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार डॉ.तांबे यांच्या उमेदवारीचे धुळे, नंदुरबार ,जळगाव, नाशिक, अहमदनगर मधील विविध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे.