कोपरगाव : कोपरगाव-अहमदनगर महार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत निकृष्ठ प्रतीचे चालले असून , याबाबत तक्रार करूनही बांधकाम विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करून ठेकेदाराच्या भ्रष्ट कामाला पाठीशी घालत आहे . याचा अर्थ ठेकेदाराच्या मिठाईचे बॉक्स नक्कीच अधिकारी आणि आजी-माजींच्या घरी पोहच झाले असतील असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
काळे यांनी पुढे म्हटले आहे की कोपरगाव – अहमदनगर रस्ता हा आधी राज्य महामार्ग होता . तो आता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. असे असूनही त्याची दुर्दशा थांबायला तयार नाही. या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्ता नावालाही शिल्लक राहिला नाही. खराब रस्त्यामुळे अनेक अपघात घडून कित्येक जीव गेले तर अनेक जणांना कायमचे अपंगत्व आले तर अनेक संसार उघड्यावर आले. एव्हढे होऊनही येथील लोकप्रतिनिधींना याचे काहीही सोयरसुतक नाही. शेवटी काही सामाजिक कार्यकर्ते , आणि जनतेचं लढा उभा करून प्रशासनाला जागे करावे लागले. यावर अधिकाऱ्यांनी घाईघाईत आपल्या मर्जीतील ठेकेदाराला या रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे टेंडर दिले असावे . कारण संबंधित ठेकेदार अत्यंत निकृष्ठ पद्धतीने खड्डे बुजवित आहे.
तक्रारी करुन देखील ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत आहे. खड्डे बुजवताना खड्ड्यातले पाणी काढले जात नाही, धुळ काढली जात नाही, खाली डांबर टाकले जात नाही. निव्वळ कामचलाऊ प्रकारे खड्डे बुजवले जात आहे. याची तक्रार आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे करूनही त्यावर अधिकारी दखल घ्यायला तयार नाही की फुकटचे श्रेय घ्यायला पुढे येणारे लोकप्रतिनिधीही जाब विचारायला तयार नाही . याचा अर्थ सदर ठेकेदाराने या कोट्यवधींच्या कामातून मिळवलेल्या मायेतून नक्कीच या अधिकाऱ्यांना मिठाई पोहच केली असल्याचा संशय घेण्यास वाव निर्माण झाली आहे. यापूर्वीही या महामार्गाचे खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येऊनही रस्त्याची परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट झाली आहे. त्यावेळी आपण तक्रार करून कोणीही दखल घेतली नाही . आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे काही दिवसातच रस्त्यावर खड्डे जसेच्या तसेच दिसणार असून शासनाचे म्हणजेच पर्यायी जनतेचे कोट्यवधी रुपये फक्त खड्ड्यात जाणार आहे.