नियमबाह्य रुग्णालयातून केली जातेय रुग्णांची लूट ; कारवाईसाठी छावा संघटनेचे नगरपालिका प्रशासना विरोधात उपोषण 

0

संगमनेर : संगमनेर शहरातील बहुतांशी रुग्णालयामधून रुग्णांची अव्वाच्या सव्वा बीले देवून लूट केली जात आहे. तसेच या रुग्णालयांमधून महात्मा फुले जन आरोग्य योजनेसह एन.ए.बी.एच व हेल्थकेअर मान्यताप्राप्त  इन्शुरन्स पॉलिसी सुविधाचा लाभ घेतला जात आहे. सदर नियमबाह्य रुग्णालये कुठल्याही प्रकारच्या निकषांमध्ये बसत नाहीत असे असताना रुग्णांच्या नावाखाली हे रुग्णालये व तेथील डॉक्टर या योजनांचा लाभ घेवून शासनाला फसवत आहेत यातील अनेक रुग्णालयाचे बांधकाम शासनाच्या निकषाप्रमाणे नाही. या सर्व नियमबाह्य रुग्णालयांवर  नगरपालिकेने त्वरीत कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रीय छावा संघटनेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष प्रविण कानवडे यांच्या नेतृत्वाखाली  उपोषण सुरू केले आहे.                                  संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हॉस्पीटलस् असून किती हॉस्पीटलस् अनाधिकृत , आधिकृत पद्धतीचे आहेत, परवानगी क्लिनिकसाठी असताना तेथे मात्र हॉस्पिटल असे असताना याची माहिती नगरपालिकेकडे उपलब्ध नसल्याने पालिकेत  किती ढिसाळ कारभार सुरूू आहे याची प्रचिती येते. शहरातील अनेक हॉस्पिटल्स मोठ मोठया इमारती मधून सुरू आहेत. त्यातच मंजूर बेड कमी असताना प्रत्यक्षात असणारे बेड जास्त आहेेत. ना हरकत दाखला व हॉस्पिटल परवानगी देताना उपलब्ध असणारी साधनसामग्रींची तपासणी करण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. सहा महिन्यातून एकदा तपासणी करण्याची जबाबदारी जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांची आहे. परंतु संगमनेर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचे स्वतःचेच हॉस्पिटल असल्याने त्यांचा पूर्ण वेळ तिकडे जातो. ते ग्रामीण रुग्णालयात कधीच उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाला पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षक मिळावा अशी मागणी आरोग्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेेे प्रवीण कानवडे यांनी सांगितले. कोरोना काळात अनेक हॉस्पिटल मधून रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट केली. अनेक हॉस्पिटलचे बांधकाम मंजूर रेखांकनाप्रमाणे नाही. काही रुग्णालयाकडे रुग्णवाहिका जाण्यास जागाही उपलब्ध नाही.वाढीव बांधकाम, अनधिकृत बांधकाम, नियमाप्रमाणे बांधकाम न करणे आदी गंभीर बाबी या संदर्भात आहेत. अधिकृत आणि अनधिकृत हॉस्पिटल कोणते हेच रुग्णांना समजत नाही. अशा सर्व हॉस्पिटलवर त्वरीत नगरपालिकेने कारवाई करावी अन्यथा हे उपोषण असेच सुरू राहील असा इशारा प्रविण कानवडे यांनी दिला आहे . या उपोषणात संपर्कप्रमुख दिनकर  घुले, तालुकाध्यक्ष जालिंदर राऊत, उपाध्यक्ष मारुती सोनवणे, शहराध्यक्ष दीपक चोरमले, उपाध्यक्ष विलास रसाळ, कार्याध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, वाहतूक सेना अध्यक्ष विजय पवार, वारकरी आघाडीचे वासुदेव महाराज, जितेंद्र मोकळ, दीपक भागवत, देविदास पवार, सचिन उगले, राजू उदावंत, रवी साबळे, सचिन बालवडे, मोबीन शेख, समाधान साळवे, नाना भालेराव, राजू चरवंडे, पोपट भारसकाळ आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here