संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील
जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे कामे डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शुक्रवारी मुंबई येथे आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.
निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीला खासदार सदाशिव लोखंडे, महसुल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी यावेळी उपस्थित होते.निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. डिसेंबर अखेरपर्यंत या दोन्ही कालव्याचे काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. यासाठीचे जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सुमारे ८३ गावातील नागरिकांना या पाण्याचा लाभ होणार असल्याचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले.अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासंदर्भात सर्व्हे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनी बाबत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली.