पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला पायी निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातलाय. दिंडीत कार घुसल्याने आठ वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे मागून कार घुसली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात आठ वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सहा वारकरी जखमी असल्याची माहिती मिळत आहे. आज सायंकाळी सात वाजता ही दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता मिरजेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार ( क्रमांक एमएट 12 DE 8938 ) दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली. यात आठ वारकऱ्यांचा मृत्यू झाला.
विठुरायाचे नामस्मरण करत निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत कार धुसली आणि समोर आलेल्या प्रत्येकाला चिरडत पुढे गेली. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा पायथ्याशी असणाऱ्या जठारवाडी गावातील या दिंडीमध्ये 32 वारकरी होते. यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाच महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
अपघात झालेली कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असल्याचे समाजत असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातात जखमी झालेल्या सहा वारकऱ्यांवर सांगोला येथे उपचार सुरु असून आहेत. सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.
मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर
दरम्यान, मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे. या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आणि या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.