पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात उरणच्या समस्या.

0

उरण दि 1(विठ्ठल ममताबादे )

राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार सोमवार दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. या पालक मंत्र्याच्या जनता दरबारात उरणच्या विविध सामाजिक संस्था, संघटनानी, नागरिकांनी आपल्या व्यथा, समस्या पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर मांडून उरण मधील विविध समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली आहे.

 उरण तालुक्यात सुसज्ज अशा मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलची गरज असून वर्षानुवर्षे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे उरणमध्ये अत्याधुनिक सेवासुविधा सह सुसज्ज असे हॉस्पीटल उरण मध्ये बनू शकली नाही. उरणच्या नागरिकांना आजही उपचारासाठी वाशी, बेलापूर, पनवेल, नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे उरण मध्ये त्वरीत सुसज्ज असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल बांधण्यात यावे अशी मागणी उरण सामाजिक संस्थेच्या वतीने पालकमंत्र्यांना करण्यात आली. उरण तालुक्यातील बोकडविरा येथे जीटीपीएस प्रकल्पात अपघात झाला होता त्या अपघातातील मयत कामगांराना सरकारी नोकरी व 50 लाख रुपये मदत करा त्या करीता स्थानिक GTPS मॅनेजमेंट कडून पाठविण्यात आलेला प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करा अशी मागणी जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील व सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी पालकमंत्र्याकडे केली आहे.सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार व जेएनपीटी विश्वस्त भूषण पाटील यांनी यावेळी वेगवेगळ्या समस्या पालकमंत्र्या समोर मांडले.जे.एन. पी. टी परिसरात व उरण तालुक्यातील इतर विभागात, परिसरात अपघात होउ नये, नागरिकांचे मृत्यु होउ नये या साठी सर्व्हिस रोडची निर्मिती करण्यात आली. मात्र या सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूने अवैध, बेकायदेशीर वाहने उभी केली जातात त्यामुळे नागरिकांचे अपघात होऊन आजपर्यंत 800 हुन अधिक व्यक्तींचे विनाकारण अनेक बळी गेले आहेत. सततचे वाहतूक कोंडी व बेकायदेशीर अवैध पार्कीगच्या समस्यातून उरणकरांची सुटका करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच उरण पूर्व विभागातील शेतजमिनीत समुद्राचे खारे पाणी शेतजमिनीत घुसून शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याकडे पालकमंत्र्याचे लक्ष वेधून समूद्रकिनारी बांधावरच पक्का रस्ता केला जावा अशी मागणी उरण सामाजिक संस्थेने पत्रव्यवहाराद्वारे तसेच प्रत्यक्ष जनता दरबारात पालक मंत्र्यांना भेटून केली. उरण मधील विविध सामाजिक संस्थांनीही तसेच अनेक नागरिकांनी आपल्या समस्या यावेळी जनता दरबारात मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here