फलटण प्रतिनिधी.
कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन अडीच वर्षापासून रखडलेली पोलीस भरती होणार असल्याच्या बातमीने तरुणांमध्ये उत्साह दिसत असतानाच शासनाने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे त्यांच्या उत्साहावर पाणी पडले आहे.
शुक्रवार दि. २७ ऑक्टोबर रोजी पोलीस महासंचालकांनी पोलीस भरतीबाबतचे परिपत्रक काढले होते. त्यानूसार ३ नोव्हेंबरपासून सुमारे 15 हजार जागांच्या भरतीची प्रक्रिया सुरु होणार होती. परंतू ४८ तासातच पोलीस महासंचालकांनी पुन्हा दुसरे परिपत्रक काढून ही भरती प्रक्रिया स्थगीत केली असल्याचे सांगितले आहे. दोन वर्षे कोवीडमुळे ही भरती झाली नाही, त्यामुळे काही उमेदवारांची वयोमर्यादा उलटून गेली आहे. त्यांनाही संधी मिळावी म्हणून काही काळासाठी ही भरती प्रक्रीया स्थगित करण्यात आल्याचे या परिपत्रकात म्हणले आहे. काही काळातच ही प्रक्रिया पुन्हा सुरु होईल आणि त्याच्या तारखा जाहीर केल्या जातील असे या परिपत्रकात म्हटले आहे.मात्र भरती जाहीर करून प्रशासकीय कारणासाठी स्थगीत केल्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.