प्रक्षोभक भाषण प्रकरणी आझम खान यांना शिक्षा

0

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या प्रक्षोभक भाषणाप्रकरणी उत्तरप्रदेशातील रामपूर न्यायालयाने त्यांना गुरुवारी तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रक्षोभक भाषण करून आझम खान चर्चेत आले होते. रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने आझम खान यांच्यावर आयपीसीच्या कलम 153ए, 505ए आणि 125 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

तीन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेमुळे आझम खान यांचं विधानसभेचं सदस्यत्वही रद्द झालं आहे. ते रामपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या कार्यलयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनातून यासंबंधीची माहिती दिली गेली आहे.

फिर्यादी पक्षाचे वकील आणि प्रभारी सहसंचालक शिव प्रकाश पांडे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी आझम खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण 7 एप्रिल 2019 रोजी घडलं असून त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. या प्रकरणात ते दोषी आढळलेत.”

आता फक्त हाच गुन्हा नाही तर आझम खान यांच्यावर उत्तरप्रदेशमध्ये 80 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या सर्व प्रकरणात त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. या प्रकरणात त्यांनी घटनात्मक संस्थेच्या विरोधात विधान करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. पण केवळ एकच प्रकरण नाही तर मागच्या काही वर्षात आझम खान हे बऱ्याचदा प्रक्षोभक भाषणं करून चर्चेत आलेत. यातल्या बऱ्याच प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये साधी एफआयआर सुद्धा नोंद झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here