साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची बाजार पेठेत गर्दी
जालना (सुदाम गाडेकर) :जालना जिल्ह्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पोळ्याच्या सणाबाबत शेतकर्यांमध्ये उत्साह असल्याचे दिसत आहे.
श्रावणी पोळ्यासाठी वाळकी, रुईछत्तीशी, चिचोंडी पाटील आदींसह तालुक्यातील बाजारपेठांच्या गावांमध्ये बैलपोळ्याच्या सणांसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. दोन-तीन दिवसांवर आलेल्या पोळा सणासाठी बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी दुकांनामध्ये शेतकर्यांची लगबग वाढली आहे. बैलांच्या सजावटीसाठी घोगरमाळ, सुताचे कासरे, शिंदोरी, शिंगात घालण्यासाठी शेंब्या, पितळे तोडे, गोंडे, हिंगूळ आदींसह बैल रंगविण्यासाठी लागणार्या विविध रंगांची दुकाने बाजारपेठेत थाटले आहेत. यंदा सर्व साहित्यांचे भाव वाढले आहेत. महागाई वाढली असली, तरी वर्षभर शेतात राबणार्या आपल्या सर्जा-राजाला सजविण्यासाठी विविध साहित्य खरेदी करण्यासाठी आखडता हात घेत नसल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे .
पोळ्यापुतीच बैलांची खरेदी
बैलांच्या वाढलेल्या किमती अन् बैल शेती वेळखावू आहे. त्यातच शेती मशागती, पेरणीसाठी यांत्रिक अवजारे बाजारात आली. शेतकर्यांना परवडणार्या किमतीत ट्रॅक्टर बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले. त्यामुळे बैलशेती काळाच्या ओघात गायब होण्याच्या मार्गावर आहे. शेतकर्यांच्या दारातील बैलजोडी आता दिसेनाशी झाली आहे. मात्र, पोळा सण साजरा करण्यासाठी हौशी व सधन शेतकरी महागड्या किमतीत बैल खरेदी करून पोळा साजरा करतात. नंतर त्या बैलांची पुन्हा विक्री केली जाते.
दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्षे पोळा सण शेतकर्यांना साजरा करता आला नाही. यंदा खरीप हंगाम जोरात असून, जनावरांना हिरवा चाराही मुबलक आहे. यंदा पोळ्याचा सण जल्लोषात साजरा करण्याच्या मनस्थितीत शेतकरी दिसत आहेत. त्यादृष्टीने लगबग सुरू आहे.
बैलांच्या झुली झाल्या गायब
सर्जा-राजाला सजविण्यासाठी रंगरंगोटी करण्याबरोबरच तो पोळ्यात उठून दिसावा, म्हणून सधन शेतकरी महागड्या झुली खरेदी करत. सध्या झुलींची किंमत बाराशे ते तीन हजार रुपयांपर्यत आहे. मात्र, बैल शेतीऐवजी ट्रॅक्टर शेतीला शेतकर्यांची पसंती असल्याने बैलांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. त्यामुळे महागड्या ‘झुली’ आता बाजारातून गायब झाल्या आहेत.