संगमनेर : संगमनेरच्या सहकार पंढरीचे जनक, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते माजी केंद्रीय कृषिमंत्री डॉ.आण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेरात तीन दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार (दि.२३) सप्टेंबर पासून (दि.२५) सप्टेंबर पर्यंत सुरू असणाऱ्या या जयंती महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ.अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण करण्यात येणार असून शनिवार (दि.२४) सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता राज्याच्या माजी महिला व बालकल्याण मंत्री आ.यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न होणार आहे. त्याचबरोबर ह.भ.प मुक्ताताई व ह.भ.प शिवानीताई चाळक यांचा किर्तन जुगलबंदीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सायंकाळी सात वाजता डान्स धमाका, धमाल गाणी, धमाल कॉमेडी असलेला युवा जल्लोष धमाका हा कार्यक्रम संपन्न होणार असून रविवार (दि.२५) सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता एकवीरा फाउंडेशन आयोजित स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलींसाठी दिग्गज महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तोंडून त्यांची यशोगाथा घे भरारी हा प्रेरणादायी संवाद संपन्न होणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी सात वाजता संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेला तुफान लोकप्रिय असणारा महाराष्ट्राची हास्य जत्रा पर्व दोनचा कार्यक्रम संपन्न होणार असून हे सर्व कार्यक्रम यशोधन कार्यालयाजवळील शेतकी संघाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, आ.डॉ सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर तसेच जयंती महोत्सव कार्यक्रम संयोजन समिती व अमृत उद्योग समूहाचे वतीने करण्यात आले आहे.