संगमनेर : भारतीय जनता पार्टीच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी सतीशराव पुंजाजी कानवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सतीशराव कानवडे यांना दिले आहे.
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांची नियुक्ती होताच पक्षाच्या संघटनात्मक बदलांना वेग आला आहे. ग्रामपंचायत, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी राज्यात स्थानिक पातळीवर खांदेपालट सुरू झाले असल्याचे पहायला मिळत आहे.त्याचाच भाग म्हणुन सतीशराव कानवडे यांची संगमनेर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सतीशराव कानवडे यांनी यापुवीॅ भाजप किसान मोर्चाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.त्यांनी सत्तेत नसताना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध आंदोलने, मोर्चा काढत सरकारला धारेवर धरले होते. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारा लढाऊ नेता अशी कानवडे यांची ओळख निर्माण झाली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी विविध योजनांचे लाभ मिळवुन देण्यासाठी कानवडे हे महत्वाची भुमिका बजावत असतात.त्यांना विविध शासकीय विभागातील अधिकारी व शेतकरी यांच्यात सुसंवाद साधून पक्षसंघटनेचे कार्य करण्याचा हातखंडा आहे. याचीच दखल घेत भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी तालुकाध्यक्ष पदांची धुरा कानवडे यांच्याकडे सोपवली आहे.कानवडे यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे, माजी आमदार वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, शिवाजीराव कर्डिले, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ.अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांनी अभिनंदन केले आहे.