कोमल झेंडे (मुंबई) यांनी खुमासदार सूत्रसंचालन करीत ही स्पर्धा उत्तरोत्तर अधिकच रंगतदार बनवली. या स्पर्धेत अनेक महिला पारंपरिक आणि हटके वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी गीत-संगीताच्या तालावर आपली कला सादर केली. संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते आदिशक्ती दुर्गामातेच्या प्रतिमेचे पूजन करून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी परीक्षक ‘घुंगरू’ नृत्याविष्कार फेम श्रीमती सिंधू नायर आणि रास-दांडियाचे प्रशिक्षक अभिजीत शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोपरगावात पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेबद्दल महिलांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. या स्पर्धेत पारंपरिक आणि आकर्षक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी आत्मविश्वासपूर्वक व्यासपीठावर येत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. स्पर्धक महिलांनी गीत-संगीताच्या तालावर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
महिलांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शारदीय नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून ‘मिस कोपरगाव’ आणि पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून महिलांनी या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल रेणुकाताई कोल्हे यांनी सर्व स्पर्धकांना धन्यवाद दिले. या स्पर्धेत ५७ वर्षीय स्वाती मुळे यांनी पारंपरिक वेशभूषेत भारुड सादर करून उत्तम सादरीकरण केले. या वयातही त्यांनी स्पर्धेत सहभागी होत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल रेणुकाताई कोल्हे यांनी त्यांचे खास अभिनंदन केले.
‘मिस कोपरगाव’ पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत स्वाती मुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत सोन्याची नथ मिळवली. त्यांना रेणुकाताई कोल्हे आणि श्रीमती सिंधू नायर यांच्या हस्ते ‘मिस कोपरगाव’ चा मुकुट घालून तसेच बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेत स्नेहा पंजाबी यांनी द्वितीय क्रमांक पटकावत चांदीचा करंडा तर चित्रा घुमरे यांनी तृतीय क्रमांक मिळवून चांदीचे नाणे पटकावले. परीक्षक श्रीमती सिंधू नायर यांनी सर्व स्पर्धकांच्या सादरीकरणाचे अवलोकन करून निकाल जाहीर केला.या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांमधून सुवर्णा विवेक सोनवणे, ज्योती मोकळ, रजनी सोनवणे, सुधाताई गायकवाड आणि चित्रा घुमरे या पाच भाग्यवान महिलांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड करण्यात आली. त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेनंतर उपस्थित महिलांनी रास-दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. स्वत: रेणुकाताई कोल्हे यांनीही त्यात सहभागी होऊन महिलांचा उत्साह वाढविला. प्रशिक्षक अभिजीत शहा यांनी महिलांना रास-दांडिया खेळातील बारकावे समजावून सांगितले. कोमल झेंडे (मुंबई) यांनी या स्पर्धेचे नेटके सूत्रसंचालन करून कार्यक्रम रंगतदार बनवला.