
संगमनेर : देशातील दळणवळणाचे अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या भारतीय डाक विभागाच्या वतीने थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा फोटो असलेले राजहंस टपाल पाकिटाचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे संगमनेरच्या समृद्ध सहकाराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात भारतीय डाक विभागाच्या वतीने या टपाल पाकिटाचे अनावरण काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आ.डॉ सुधीर तांबे, सौ कांचनताई थोरात ,नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात ,बाजीराव पा. खेमनर, लक्ष्मणराव कुटे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ ,कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, डॉ. हसमुख जैन, राजेंद्र चकोर, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ सुजित खिलारी ,डाक विभागाचे अमोल गवांदे, अमित देशपांडे, महेश कोबारणे, धीरज अग्रवाल आदी उपस्थित होते.
भारतीय डाक विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती, निसर्गाचे पैलू ,सुंदर आणि संकटात सापडलेल्या वनस्पती, पर्यावरण विषयक समस्या, कृषी उपक्रम, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी ,क्रीडा इत्यादींचे चित्रणांसह टपाल व पाकिटे असतात. ही तिकिटे व पाकीट ही संपूर्ण देशभरात वापरली जातात. अशा प्रकारच्या टपाल पाकिटावर जागा मिळणे हा मोठा सन्मान समजला जातो. थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान दिले असून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार चळवळीतून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे.
संगमनेरच्या सहकार हा आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली देशाला दिशादर्शक ठरला आहे.या सहकारातील राजहंस दूध संघ हा गोरगरीब कुटुंबाची आर्थिक कामधेनु आहे.या दुधसंघाच्या माध्यमातून तालुक्यात मोठे दुधाचे उत्पादन होत असून सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली आहे. दूध संघाने गुणवत्तेने निर्माण केलेला लौकिक यामुळे भारतीय डाक विभागाने टपाल पाकिटावर राजहंसची माहिती देत थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा फोटो देऊन सन्मान केला आहे. या टपाल पाकिटाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी आ. बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय डाक विभागाच्या पाकिटावर जागा मिळणे हा मोठा सन्मान आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्थांचा कारभार सुरू आहे. या सहकारामधील विविध संस्थांनी देशपातळीवर लौकिक मिळवला असून राजहंस दूध संघाने ही आपला मोठा लौकिक निर्माण केला आहे. गुजरात, कर्नाटक सह मराठवाडा, विदर्भात या दुधाला मोठी मागणी आहे.राजहंस, टपाल पाकिटावर आल्याने संपूर्ण भारतभर राजहंस दुधाचा गौरव होईल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजीतसिंह देशमुख यांनी केले.यावेळी डाक विभागाच्या वतीने आ. थोरात यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.