नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डोंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ १८५ हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ २५ खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे २८ ऑक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात आणि 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची स्थापना होऊ शकते.
ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे नाव देखील होते. मात्र त्यांनी आपले नाव मागे घेतल्याने सोमवारी ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व हाती घेण्याची शक्यता अधिक वाढली. बोरिस जॉन्सन यांनी रविवारी रात्री पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती.
तत्पूर्वी आपली उमेदवारी जाहीर करताना ऋषी सुनक म्हणाले होते की, त्यांना देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करायची आहे, पक्षाला एकत्र करायचे आहे आणि देशासाठी काम करायचे आहे. यापूर्वी सोमवारी, माजी गृहमंत्री प्रिती पटेल, कॅबिनेट मंत्री जेम्स क्लेवर्ली आणि नदीम जाहवी यांच्यासह अनेक प्रमुख कंझर्व्हेटिव्ह खासदारांनी सुनकच्या समर्थनार्थ जॉन्सन यांच्या गटातून बाहेर पडले. प्रिती पटेल या भारतीय वंशाच्या माजी ब्रिटीश मंत्री आहेत. ज्यांनी मागील महिन्यात लिझ ट्रस पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. कंझर्व्हेटिव्ह पक्षाने सुनक यांना नेतृत्वाची संधी द्यावी, असं त्या म्हणाल्या होत्या.