भीमाबाई आंबेडकर पुरस्कार सुनीता भोसले यांना दि.४ डिसेंबर रोजी वितरण

0

सातारा :   येथील संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री महामाता भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या २४ व्या पुरस्कारासाठी पारधी समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व  विंचवाचं तेल या बहुचर्चित आत्मकथनाच्या लेखिका सुनीता भोसले (आंबळे-शिरुर , पुणे )  यांची निवड करण्यात आली असून वितरण सोहळा रविवार दि.४ डिसेंबर २०२२ रोजी नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सकाळी ११।। वा.होणार आहे.

    साहित्य,कला, संस्कृती,महिला विकास व परिवर्तनाची चळवळ आदी क्षेत्रात मौलिक योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्याच्या हेतूने सन १९९८ सालापासून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रु.५,०००/-, स्मृतीचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ असे आहे.सदरचा पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत,लेखक, शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते  प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती अध्यक्ष दिनकर झिंब्रे व उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली.

           मानवी हक्क अभियानाचे संस्थापक स्मृतीशेष ॲड. एकनाथ आवाड उर्फ जिजा यांच्या प्रेरणेने सुनिताताई भोसले यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांची  विचारधारा आदिवासी भटक्या समाजात रुजवण्याचे काम गेल्या २० वर्षापासून करीत आहेत. त्यांनी क्रांती संस्था व आदिवासी फासेपारधी समाज संघटना, महाराष्ट्रच्या माध्यमातून  शैक्षणिक विकासाचे रचनात्मक काम हाती घेतले आहे. त्यांनी भटक्या समाजातील अनिष्ट चालीरीती, प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रबोधन तसेच अन्याय अत्याचार विरोधात संघर्ष करीत न्याय व हक्क मिळवण्यासाठी लढाई चालवली आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जातपंचायत  थांबवण्यात पुढाकार घेऊन  मोठे योगदान दिले आहे.नुकताच त्यांना महाराष्ट्र फौंडेशनच्यावतीने  कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी,डॉ.ज्योती लांजेवार (नागपूर), प्रा.पुष्पा भावे (मुंबई), रझिया पटेल (पुणे), बेबीताई कांबळे (फलटण), यमुनाबाई वाईकर (वाई),प्रा.डाॅ.प्रज्ञा दया पवार(मुंबई), उर्मिला पवार (मुंबई), डॉ.सिसिलिया कार्व्हालो (वसई),प्रा.इंदिरा आठवले (नाशिक), पद्मश्री तिस्ता सेटलवाड (मुंबई),हिरा बनसोडे (मुंबई), प्रतिमा जोशी (मुंबई), उल्का महाजन (पनवेल),प्रा. सुशीला मूल-जाधव (औरंगाबाद), डॉ.गेल ऑम्वेट (कासेगाव), मेधाताई पाटकर (मुंबई),संध्या नरे-पवार (मुंबई),मुक्ता दाभोलकर (दापोली), मुक्ता मनोहर (पुणे),प्रा.आशालता कांबळे (डोंबिवली),निशा शिवूरकर (संगमनेर) व शिल्पा कांबळे (मुंबई),चेतना सिन्हा (म्हसवड-माण)आदी महिलांना  पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here