मलवडी ता.माण येथे गोळीबार,सराफाला लुटले,तलवारीने दोघांवर वारही-एका संशयीतास पकडले.

0

गोंदवले, विजय ढालपे – तलवार व बंदुकीचा वापर करून  मलवडी ता.माण येथे सोने-चांदी व्यवसायिकाकडील 50तोळे सोने,40 किलो चांदी व रोख सात लाख रूपये लुटल्याची घटना काल सायंकाळी घडली.या घटनेदरम्यान एका संशयीताने व्यावसायिकासह त्याच्या पुतण्यावर तलवारीने वार केले.तरीही,त्याला दोघांनी पकडुन ठेवले.या संशयीतास सोडवण्यासाठी लुटारूंनी गोळीबार केला.त्यानंतर तिघे दुचावरून पळून गेले.या खळबळजनक घटनेमुळे माण तालुक्यासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

     याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,मलवडी येथील बस स्थानक  परिसरातील मलवडी- बुध रस्त्याकडेला आर.एल.काॅम्लेक्समध्ये श्रीकांत तुकाराम कदम यांचे जय भवानी ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दुकान आहे.दिवसभर व्यवसाय केल्यानंतर सांयकाळी साधारण साडेसातच्या सुमारास दुकानातील सर्व ऐवज त्यांनी तीन पिशव्यामध्ये भरला.त्यात 50 तोळे सोने,साधारण 40 किलो चांदी व रोख  सात लाख रूपये असा ऐवज होता.या पिशव्या घेऊन ते आपल्या दुचाकीवरून पुतण्या श्रीजित शिवाजी कदम यांच्यासोबत घरी निघाले होते. सायंकाळी सात वाजुन चाळीस मिनीटांच्या दरम्यान मलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व त्रिबंकराव काळे विद्यालयातील रस्त्याने जात असताना अचानक एक जण समोर आला.संशय आल्यामुळे त्यांनी गाडी पळविण्याचा प्रयत्न केला.मात्र,तेवढ्यात अजून तिघे जण धावत आले.त्यांनी श्रीजितला जोरात दणका दिला.त्यामुळे श्रीजित याचा गाडीवरील ताबा सुटून गाडी खाली पडली.गाडीवरून खाली पडलेल्या तीन पिशव्या दोघांनी उचलल्या व तिघे त्यांच्या  दुचाकीकडे  पळाले,तर एकाने तलवारीने श्रीजितच्या हातावर,तर श्रीकांत यांच्या खाद्यांवर वार केला.अशा अवस्थेतही या दोघां चुलत्या-पुतण्यांनी मिळुन या संशयितास पकडुन ठेवुन जोरजोरात ओरडण्यास सुरूवात केली.

    आपला साथीदार परत आला नाही,हे लक्षात येताच एक जण दुचाकीवरून परत आला व त्याने बंदुकीतुन तीन-चार वेळा गोळ्या झाडल्या.त्यातील एक गोळी चुकवताना श्रीकांत यांनी पकडुन ठेवलेल्या संशयितास पुढे केल्याने त्याच्या पाठीला चाटुन गोळी गेली.ही झटापट सुरू असतानाच ग्रामस्थ जमा होऊ लागल्याने तीन चोरटे पळुन गेले.या घटनेची माहिती दहिवडी पोलिस ठाण्याला दिल्यानंतर तत्काळ स.पो.नि.अक्षय सोनावणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. पकडलेल्या संशयितास प्राथमिक उपचार करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.उर्वरित चोरट्यांचा तपास वेखात सुरू असून रात्रीच अतिरिक्त पोलिस अधिक्षक अजित बो-हाडे,पोलिस उपअधिक्षक गणेश केंद्रे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

     या घटनेमुळे संपूर्ण  माण तालुक्यात खळबळ माजली आहे.पोलिस यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here