‘मशाल पेटली महाराष्ट्रात घुसली’च्या घोषणा
पंढरपूर : प्रतिनिधी
मशाल पेटवून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘मशाल’ या नव्या चिन्हाचे स्वागत आज बुधवार रोजी पंढरपुरात जल्लोषात केले.
जुना कराड नाका, गाताडे प्लॉट येथे उपशहरप्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यांच्या कार्यालयासमोर मोठ्या जल्लोषात नव्या चिन्हाचे स्वागत करण्यात आले.
प्रारंभी प्रज्वलित केलेल्या मशालीचे पूजन शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांच्या हस्ते करण्यात आले, यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.
यावेळी मोठ्या उत्साहात भगव्या शाली परिधान केलेल्या शिवसैनिकांनी जल्लोष केला. तसेच यावेळी शिवसैनिकांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, मशाल पेटली महाराष्ट्रात घुसली, आली रे आली मशाल आली, या गद्दारांचं करायचं काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पंढरपूर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेतील गद्दारांना हाताशी धरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे चिन्ह काढून घेण्यात आले. त्यामुळे गद्दारांच्या गटाला आसुरी आनंद झाला आहे. परंतु शिवसेनेला चिन्हामुळे फारसा फरक पडत नाही. आम्हाला मशालचिन्ह मिळाल्यामुळे राज्यातील तमाम शिवसैनिक आनंदी झाला आहे. हे चिन्ह आता आम्ही घराघरात पोहोचवणार आहोत. २०२४ साली होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर आम्ही भगवा फडकवू असेही शिवसेना पंढरपूर उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे यावेळी म्हणाले. याप्रसंगी पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.