
संगमनेर : घुलेवाडी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सीताराम राऊत यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केलेली नसताना ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने घुलेवाडी गाव व परिसरातील गावात संतापाची लाट पसरली आहे. याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन दूध का दूध पाणी का पाणी करत सत्य समोर आणण्याची मागणी येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गावकऱ्यांनी केली आहे.
याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई गुंजाळ, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई अभंग, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील राऊत, घुलेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राऊत, उपसरपंच शंकर ढमाले, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पानसरे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल झाल्याबद्दल संताप व्यक्त करत प्रसिद्धीस निवेदन देत या घटनेचा निषेध केला असून माध्यमांना दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की दि.१९ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत घुलेवाडी कार्यालयासमोर सीताराम राऊत यांच्या गाडीचा पाठलाग करून, कविता संतोष अभंग, विद्या संतोष अभंग, भारत संभाजी भोसले व प्रथमेश संतोष अभंग यांनी त्यांना मारहाण व शिवीगाळ करून, त्याचे शुटींग करून समाज माध्यमांवर प्रसारित केले होते. याबाबत सीताराम राऊत यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर तक्रार दाखल केली होती. सिताराम राऊत यांना झालेल्या या मारहाणीचा व शिवीगाळीचा निषेध म्हणून घुलेवाडी ग्रामस्थांनी दि. २० सप्टेंबर रोजी घुलेवाडी गाव कडकडीत बंद ठेवले होते व हजारो ग्रांमस्थ एकत्र जमून निषेध मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलीस राऊत यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करतील व योग्य कार्यवाही करतील असे आश्वासन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी भारत संभाजी भोसले व प्रथमेश संतोष अभंग यांना अटक करून पोलीस रिमांड मिळाली होती. त्यानंतर कविता संतोष अभंग व विद्या संतोष अभंग या अनेक दिवस फरार होत्या. त्यांना संगमनेर शहर पोलिसांनी दि. १० ऑक्टोबर रोजी अटक केली. त्यावेळी त्यांनी सिताराम पुंजा राऊत त्यांचे बंधू संजय पुंजा राऊत, संतोष लहानू राऊत यांच्यासह अनोळखी दहा ते पंधरा लोकांनी
जातीवाचक शिवीगाळ व घरावर हल्ला केल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. या तक्रारीच्या आधारावर जातीवाचक शिवीगाळीचा संदर्भ घेऊन पोलिसांनी वरील लोकांवर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला. खरेतर सीताराम राऊत यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्यानंतर ते स्वतः लगेचच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर झाले व त्यांनी अभंग व भोसले यांच्या विरुद्ध रीतसर तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये सीताराम राऊत पोलीस ठाण्यात बसले असल्याची वेळ, तसेच त्यांना मारहाण होत असतानाचा आरोपींनीच प्रसारित केलेला व्हिडिओ पहिला असता, कोण कोणास मारहाण करत आहे व शिवीगाळ करत आहे हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ असताना व सर्व वस्तुस्थिती पोलिसांसमोर असताना पोलिसांनी अशाप्रकारचा खोटा गुन्हा दाखल करून घेणे हीच बाब संताप आणणारी आहे. घुलेवाडी हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठे व दाट लोकवस्ती असणारे गाव आहे. या गावात सर्व जातीधर्माचे लोक मोठ्या गुण्यागोविंदाने राहतात. सीताराम राऊत हे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान समितीचे ही समिती स्थापन झाल्यापासून आजतागायत ग्रामसभेने नियुक्त केलेले अध्यक्ष आहेत. त्याच बरोबर पुरोगामी चळवळीतील शाहू, फुले, आंबेडकर यांच्या समताधीष्टीत विचारसरणीचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अशाप्रकारची जातीवाचक शिवीगाळ किंवा अवमान ते करणार नाहीत याची सर्व ग्रांमस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांना खात्री आहे. त्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला खोटा गुन्हा हा संतापजनक आहे. शिवीगाळ व मारहाण करून काहीच हाती लागत नाही म्हणून जातीवाचक गोष्टीचा खोटा आधार घेऊन तक्रार दाखल करण्याचा हा आरोपींचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यांचा ग्रांमस्थ व नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी दूध का दूध पानी का पानी करत या घटनेचा सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई गुंजाळ, पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई अभंग, पंचायत समितीचे माजी सदस्य सुनील राऊत, घुलेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच दत्तात्रय राऊत, उपसरपंच शंकर ढमाले, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पानसरे यांच्यासहित ग्रामस्थांंनी केली आहे.