मातोश्री शेत, पाणंद रस्ते योजनेंतर्गत मंजूर असलेल्या कामांना निधी उपलब्ध करण्याबाबत आ. रोहित पवार यांनी घेतली रोहयो मंत्र्यांची भेट

0

लवकरच मतदारसंघातील उर्वरित पाणंद रस्त्यांचा प्रश्नही लागणार मार्गी

 जामखेड तालुका प्रतिनिधी. – कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांनी नुकतीच रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांची भेट घेतली आहे. मतदारसंघातील प्रलंबित शेत पाणंद रस्त्यांची कामे मार्गी लागावी याबाबत या भेटीमध्ये चर्चा झाली. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघात गेल्या दोन वर्षात आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून पहिल्या तीन टप्प्यात दीड हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे पाणंद रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. 

अशातच चौथ्या टप्प्यातील प्रत्येक गावामध्ये चार ते पाच रस्ते शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रस्तावित केले होते. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर त्या-त्या संबंधित ग्रामपंचायतीला वर्क ऑर्डरचे वितरण देखील करण्यात आले होते. यामध्ये चौथ्या टप्प्यात १६३१ किमीच्या ९३७ कामांचा समावेश आहे. या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करण्याबाबतची मागणी आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदयांना भेटून केली आहे. 

आतापर्यंत मतदारसंघात पूर्ण झालेल्या दीड हजार किमी पाणंद रस्त्यांचा फायदा हा दोन्ही तालुक्यातील एक लाख ८० हजार नागरिकांना होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच येत्या काळात उर्वरित सर्व पाणंद रस्ते देखील पूर्ण करून मतदारसंघातील नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सतत प्रयत्न करत राहणार असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणे, शेतात जाणे, तसेच वाड्या-वस्त्यांवर राहणारे नागरिक, शालेय विद्यार्थी व रुग्ण या सर्वांची होणारी गैरसोय कायमची मार्गी लागत आहे. सत्तेत नसतानाही आमदार रोहित पवार यांनी आपल्या कामाचा सपाटा हा नेहमीप्रमाणे कायम ठेवला असल्याचं या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. तसेच मतदारसंघातील विकासकामांसाठी आणि  प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी ते कायमच पुढाकार घेत संबंधितांकडे वेळोवेळी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करत असतात. सर्व टप्पे मिळून तब्बल तीन हजार किमीचे महाराष्ट्रात सगळ्यात मोठे पाणंद रस्त्याचे काम हे कर्जत-जामखेड मतदारसंघात येत्या काळात पाहायला मिळेल.

प्रतिक्रिया 

पाणंद रस्ते ग्रामस्थांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आजपर्यंत लोकांनी व शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर बीडीओ, ग्रामसेवक, ग्रामविकासचे सर्व अधिकारी, महसूलचे अधिकारी या सर्वांनी सहकार्य केलं म्हणून १ लाख ८० हजार सामान्य लोकांना आपण न्याय देऊ शकलो. काही लोक वेगळ्या प्रकारे यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी मंजूर केलेली कामे यांना स्थगिती देऊन ती त्यांनी केली, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु लोकांना सर्व गोष्टी माहिती असतात. त्यामुळे ही सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत आणि मंत्री महोदयांनी याबाबत आश्र्वासित केले आहे. 

आ. रोहित पवार

(कर्जत – जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here