मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर उद्याच राजीनामा देईन – अब्दूल सत्तार

0

औरंगाबाद: तुम्ही दारू पिता का? असं एका अधिकाऱ्याला विचारल्याने राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) चांगलेच अडचणीत आले आहेत. सत्तार यांच्या या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. विरोधकांनीही या प्रकरणी सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (cm eknath shinde) सांगितलं सत्तारांनी राजीनामा द्यावा, तर बुधवार पर्यंत माझ्या राजीनाम्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते, असं मोठं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मला राजीनामा देण्याची परवानगी दिली तर बुधवारी तुमच्याकडे सत्तार यांनी राजीनामा दिल्याची ब्रेकिंग न्यूज येऊ शकते. सत्तार यांनी राजीनामा दिल्यानंतर कोण गदा घेऊन येतं आणि त्याचा मुकाबला आमची ढाल तलवार कशी करते हे तुम्हाला दिसेल. चंद्रकांत खैरे यांनी माझ्या विरोधात येऊन लढावं. त्यांच्यासाठी सिल्लोडचं मैदान खाली आहे. चंद्रकांत खैरे यांनी हातात घेतलेल्या गदेसाठी हनुमानाची ताकद लागते. ती ताकद खैरे यांच्याकडे नाहीय ते माझ्याशी काय लढणार? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला.

यापूर्वीच एक विकेट मी इम्तियाज जलील यांच्या माध्यमातून घेतली आहे. माझ्याकडे अचूक बॉलिंग आहे. कुणाची कशी विकेट घ्यायची, कशा परिस्थितीत घ्यायची हे मला माहीत आहे. बॅटिंगला येणाऱ्या प्रत्येकाला माझा हा इशारा आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री ज्याची विकेट घ्यायला सांगतील त्याची विकेट घेणार, असा इशाराही त्यांनी दिला.

आमचे हनुमान महाराज देशाचे दैवत आहेत. ज्या प्रमाणे हनुमान हे प्रभू रामाचे भक्त आहेत. तसाच मी एकनाथ शिंदे यांचा भक्त आहे. दोघांचीही मॅच होऊनच जाऊ द्या. मी कृषीमंत्री आहे. आमदार आहे. पण खैरेंकडे कोणतंच पद नाही. राजीनामा दिल्यावर त्यांच्या नेत्यांनी येऊन लढावं. आता काय ते उद्याच होऊ द्या, असं आव्हान यांनी केलं.

आमदारांच्या सुरक्षेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हल्ल्याची चिथावणी होती म्हणून आमच्या आमदारांना सुरक्षा देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर हल्ला करण्याचा प्लॅन असल्याचा रिपोर्ट आला होता. आमदारांवर हल्ले होणार होते. भविष्यात आमदारांबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही सुरक्षा देण्यात आली आहे. काही लोकांचा काही तरी घातपात करण्याचा संशय होता म्हणून संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here