मुलायम सिंह यादव यांचं निधन

0

लखनऊ : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. दीर्घ आजारामुळे गुरुग्रामच्या रुग्णालयात त्यांचं निधन झालं. 2 ऑक्टोबरपासून ते मेंदाता या रुग्णालयात दाखल होते. अखिलेश यादव यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. “माझे वडील आणि सर्वांचे नेताजी आता राहिले नाहीत,” असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

तीन वेळा मुख्यमंत्री बनले
मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 साली उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यात झाला.

मुलायम सिंह यादव यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद भूषवलं आहे. तसंच ते केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री सुद्धा होते.

1967 साली उत्तर प्रदेशच्या जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक जिंकणारे मुलायम सिंह यादव 1989 साली उत्तर प्रेदशचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 1993 मध्ये दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्री बनले.1996 रोजी मुलायम सिंह यादव यांनी मैनपूरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि 1996 ते 1998 युनायटेड फ्रंट सरकारच्या कार्यकाळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही काम केलं. यानंतर त्यांनी संभल आणि कन्नौज इथूनही लोकसभा निवडणूक जिंकली. 2003 साली ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. 2019 साली त्यांनी पुन्हा मैनपूरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते जिंकले.

राष्ट्रपतींसह पंतप्रधान आणि इतर नेत्यांची श्रद्धांजली
मुलायम सिंह यादव यांच्या निधनाचे वृत्त येताच सोशल मीडियावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं. “मुलायम सिंह यादव यांचं निधन म्हणजे देशाचं नुकसान आहे. एका सामान्य घरातल्या मुलायम सिंह यादव यांचं यश मात्र असामान्य आहे. ‘धरती पुत्र’ मुलायमजी जमिनीशी नाळ असलेले एक दिग्गज नेते होते. सर्व पक्षाचे लोक त्यांचा सन्मान करत होते. त्यांच्या कुटुंबियांसह आणि समर्थकांसोबत माझ्या सहवेदना.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं. मुलायम सिंह यादव यांच्याबाबत त्यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “मुलायम सिंह यादव हे उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व होतं. ते विनम्र आणि जमिनीवरील नेते म्हणून ओळखले जायचे. लोकांच्या समस्यांबाबत ते संवेदनशील होते. त्यांनी कायम तत्परतेने लोकांची सेवा केली. लोकनायक जेपी आणि डॉ.लोहीया यांचे आदर्श लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं.”

आणखी एका ट्वीटमध्ये मोदी लिहितात, “आम्ही दोघंही जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मुलायम सिंह यादवजी यांच्याशी अनेकदा माझी चर्चा होत होती. आमची जवळीक तशीच कायम राहिली. त्यांचे विचार जाणून घेण्यास मी कायम उत्सुक असायचो. त्यांच्या निधनामुळे मी दु:खी आहे. त्यांचं कुटुंबं आणि लाखो समर्थकांसोबत माझ्या सहवेदना आहेत. ओम शांती.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी सुद्धा ट्वीटरच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू यादव यांनी मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. यावेळी ते भावुक झाले.

ते म्हणाले, “मुलायम सिंह यादव यांनी देशभरात समाजवादी आंदोलन पुढे वाढवलं. राम मनोहर लोहिया, जनकनायक कर्पूरी ठाकुर, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी प्रेरित होते. आमची मुलगी त्यांच्या घरी आहे. एक घटना माझ्या लक्षात आहे. आम्ही तिलक करण्यासाठी बिहारमधून जेवढे लोक गेलो होतो नेताजींनी स्वत: आमचं आदरातिथ्य केलं होतं. मी अखिलेशसोबत बोललो आहे. नेताजींच्या अंत्यसंस्कारासाठी मी जाऊ शकणार नाही कारण उपचारासाठी मी सिंगापूर येथे जाणार आहे. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तेजस्वी जातील.”

अखिलेश आणि त्यांच्या कुटुंबाला दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना मी करतो असंही लालू प्रसाद यादव म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करत मुलायम सिंह यादव यांना श्रद्धांजली दिली. ते म्हणाले, “मुलायम सिंह यादव यांचं निधन अत्यंत दु:खद आहे. ते जमिनी राजकारणाशी जोडलेले एक सच्चे योद्धा होते. अखिलेश यादव आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना आहेत.”

शरद पवार यांची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मुलायम सिंह यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

ते म्हणाले, “लोहिया यांच्या विचारांवर मुलायम सिंह यादव यांनी राजकीय वाटचाल केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात ते सक्रिय होते. संरक्षणमंत्री म्हणूनही त्यांनी चांगली कामगिरी केली. विरोधकांनी एकत्र यावं अशी त्यांची भूमिका होती. मुलायम सिंह यादव यांच्या निधनामुळे वैयक्तिक नुकसान सुद्धा झालं आहे. समाजवादी चळवळीचं मोठं नुकसान झालं आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here