लंपीचे संकट समोर असताना पालिका प्रशासनाची मात्र बघ्याची भूमिका
कोपरगाव : राज्यात विशेषतः अहमदनगर जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी या आजाराने थैमान घातले असून शेतकऱ्यांपुढे पशुधन वाचविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. हा आजार जनावरांमध्ये संसर्गजन्य पद्धतीने वाढत आहे. संसर्ग झालेली जनावरे माणसांच्या संपर्कात आल्यास माणसांमध्येही हा आजार बळावण्याची धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, असे असताना कोपरगाव नगर पालिका प्रशासनाला याचे मात्र कोणतेही गांभीर्य दिसत नाही. शहरामध्ये मोकाट जनवरानी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे . आतापर्यंत या मोकाट जनावरांमुळे शहरात अनेक अपघात घडले आहे. त्यात अनेक नागरिक जायबंदी झाले आहेत. तर काही महिन्यापूर्वी एका शाळकरी मुलीवर या मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. आता मात्र लंपी आजारामुळे जनावरांसोबत मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. राज्य सरकारने लंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरे चारण्यासाठी मोकळे सोडण्यास बंदी घातली आहे. जनावरांचे बाजार भरवण्यासोबतच जनावरांच्या वाहतुकीवरही बंदी घातली आहे. असे असताना कोपरगाव नगर पालिका या मोकाट जनावरांना आळा घालण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. <p>याबाबत माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पालिका प्रशासनाकडे मोकाट जनावरे पकडून त्यांच्या असलेल्या मालकांवर कारवाईची मागणी केली होती . परंतु पालिका प्रशासनाने त्यांच्या मागणीलाही केराची टोपली दाखवली आहे.
कोपरगाव शहर व परिसरात मोकाट जनावरांच्या प्रश्नावर अनेक वेळा आंदोलने, निवेदने देऊन देखील कोपरगाव नगरपालिका प्रशासन ढिम्म असून आता शहरातील मोकाट जनावरांना या रोगाची लागण झाली तर मात्र परिस्थितीत केव्हा हाता बाहेर जाईल हे सांगता येत नाही.
हा आजार प्रादुर्भाव झालेल्या जनावरांच्या अंगावर बसणाऱ्या माशा,गोचीड यामुळे फैलावत असून शहरातील मोकाट जनावरांना याचा संसर्ग झाल्यास जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नगरपालिका प्रशासनाने तात्काळ शहरातील मोकाट जनावरे मालकांना नोटीस देऊन ही जनावरे बंदिस्त करण्या संदर्भात कारवाई करावी किंवा स्वतः कोंडवाड्यात डांबून जनावरे मालकांवर गुन्हे दाखल करावे. अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.