येवला औद्योगीक वसाहत संचालक मंडळ निवडणूक; योगेंद्र वाघ, सुहास अलगट बिनविरोध

0

येवला (प्रतिनिधी) : येवला औद्योगीक सहकारी वसाहत मर्या. संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीसाठी दाखल सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, अनुसुचित जाती जमाती राखीव मतदार संघात योगेंद्र वाघ तर भटक्या जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघात सुहास अलगट यांची  प्रतिस्पर्ध्या अभावी बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे.

येवला औद्योगीक सहकारी वसाहत मर्या. संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 30 जानेवारी पर्यंत होती. तर दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 जानेवारी रोजी संस्थेच्या कार्यालयात झाली. यावेळी सर्व दाखल नामनिर्देशन वैध ठरले. 1 फेब्रुवारी रोजी वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिध्द करण्यात आली. नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतीम तारीख 15 फेब्रुवारी असून 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान होणार आहे. तर मतमोजणी त्याच दिवशी 4.30 वाजता होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र शेजवळ यांनी दिली. 

मतदार संघ निहाय (कंसात जागा) दाखल उमेदवारी अर्ज असे, कारखानदार मतदार संघात (जागा 7) : अनिल सितारामसा कुक्कर, विक्रम सहदेव गायकवाड, राजेश सुखराज भंडारी, अनिल रूपचंद मुथा, अरूण भगवान भावसार, अंबादास बालाजी बनकर, भोलानाथ धोंडीराम लोणारी, श्याम नारायण कंदलकर, सुकृत सुदाम पाटील. इतर मागास प्रवर्ग मतदार संघ (1) : प्रविण बाळासा पहिलवान, अस्मिता विक्रम गायकवाड. महिला राखीव मतदार संघ (2) : चारूशिला पुरूषोत्तम काबरा, अस्मिता विक्रम गायकवाड, जयश्री रामदास काळे.

संचालक मंडळाच्या 13 जागा असतांना सोसायटी मतदार संघात पात्र सभासद मतदारच नसल्याने ही जागा रिक्त राहणार असून उर्वरीत 12 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यातही दोन जागा बिनविरोध झाल्यात जमा असून उमेदवारी अर्ज माघारीनंतर कारखानदार, महिला राखीव व इतर मागास या तीन मतदारसंघातील निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here