रस्ता लूट करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला यश

0

संगमनेर : रात्रीच्या वेळेस रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वरांना अडवून चाकूचा धाक दाखवत लुटमार करणाऱ्या तीन आरोपींना संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकत जेरबंद केले. यावेळी या आरोपींकडून सुमारे २ लाख ७८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात या पथकाला यश मिळाले.

       (दि.१५) ऑगस्ट रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास संगमनेर जोवेॅ रोडवर असणाऱ्या निभांळे चौफुली वर रहिमपूर ता.संगमनेर येथील धंनजय बाबासाहेब वर्पे  हे व त्यांचे मित्र मोटार सायकलवरुन घरी जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना आडवुन चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील दोन मोबाईल व रोख रक्कम काढुन घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि.१६) ऑगस्ट रोजी रात्री या घटनास्थळापासून जवळच असणाऱ्या प्रवरा नदीच्या पुला जवळ वाघापूर ता.संगमनेर येथील प्रभाकर चंदू आव्हाड हे रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास मोटार सायकल वरून घरी जात असताना तीन अनोळखी इसमानी त्यांना अडवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली होती.(दि.१९) ऑगस्ट रोजी २ वाजेच्या  सुमारास पोखरी हवेलीच्या निळवंडे कॅनॉल जवळ पारेगाव खुर्द ता.संगमनेर येथील सागर विठ्ठल काळे हे मोटार सायकल वरून घरी जात असताना आरोपींनी गाडी आडवी लावून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच मोबाईल, रोख रक्कम व इतर कागदपत्रे घेऊन फरार झाले.(दि.२४) ऑगस्ट रोजी जांभूळवाडी फाट्याचे जवळ फौजी ढाब्या समोर पिंपळे ता. संगमनेर येथील अमोल गवराम कोटकर हे त्यांचा टेम्पो लावून गाडीत झोपले असताना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास तीन अनोळखी इसमानी मोटार सायकल वरून येऊन टेम्पो मध्ये घुसून चाकूचा धाक दाखवून मारहाण करत मोबाईल, रोख रक्कम व इतर कागदपत्रे घेऊन पोबारा केला होता. तसेच (दि.२९) ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास अकोले नाका परिसरात असणाऱ्या हॉटेल राज पॅलेस जवळ आदिनाथ तुकाराम मोरे रा.अंभोरे ता.संगमनेर हे त्यांच्या मित्रासोबत थांबलेले असताना तीन अनोळखी इसमानी मोटार सायकल वरून येत त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली होती. सततच्या या घटनेमुळे संगमनेरचे पोलीसही चक्रावून गेले होते. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून एक पथक तयार केले या पथकात पो.ना आण्णासाहेब दातीर, पो.कॉअमृत आढाव, पो.कॉ  सुभाष बोडखे, पो.कॉ  प्रमोद गाडेकर, पो.कॉ गणेश शिंदे, सायबर सेलचे पो.ना फुरकान शेख, पो.कॉ प्रमोद जाधव, व पो.कॉ आकाश बहिरट यांचा समावेश होता. पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपी कलीम अकबर पठाण (वय २०), सलीम अकबर पठाण (वय २२) रा.कोल्हेवाडी रोड, संगमनेर तसेच जुनेद युनूस शेख (वय २३) रा.जमजम कॉलनी संगमनेर यांना बेड्या ठोकल्या. यातील कलीम पठाण याला झरेकाठी, सलीम पठाण याला धांदरफळ खुर्द तर जुनेद शेख याला मदिना नगर संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एचएफ डीलक्स मोटार सायकल, चाकू, चोरीस गेलेले मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २ लाख ७८  हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. सदर आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सदर आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना बुधवार (दि.२१) ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक बारकु जाणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here