राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करण्याची राजू शेट्टी यांची मागणी

0

सांगली : राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे तातडीने ऑनलाईन करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि वैद्यमापन नियंत्रक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांचेकडे केली आहे. सिंघल यांनी साखर कारखान्यांचे वजनकाटे संगणकीय प्रणाली एकत्र करून तातडीने ऑनलाईन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.
राज्यातील साखर कारखान्यांचे सर्व वजन काटे ऑनलाईन करून वजन काट्यांचे कॅलिब्रेशनमध्ये पारदर्शक आणून संगणक प्रणाली एकच ठेवावी, तसेच त्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैद्यमापन विभागाकडूनच व्हावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
दुसरीकडे स्वाभिमानीकडून 7 नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर संकुलवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी सिंघल यांची मुंबईत भेट घेत चर्चा केली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात तफावत येत असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड मोठी लूट सुरू आहे. महाराष्ट्रात सुमारे 35 लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी उसाचे वजन काटे हे विश्वासार्ह व अचूक असणे आवश्यक आहे. वजन काट्यामध्ये पारदर्शकता नसल्याने वजनात मोठी तफावत येते. खासगी काट्यावर वजन केलेला ऊस साखर कारखानदार नाकारत असल्याच्या तक्रारी येतात. शेतकऱ्यांना पावत्या दिल्या जात नाही. त्यासाठी आपण या विषयाकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या या तक्रारीचे गांभीर्य पाहता वैद्यमापन विभागाकडून यावर त्वरीत कार्यवाही होऊन साखर कारखान्यांचे वजन काट्यांच्या कॅलिब्रेशनमध्ये एकसमानता, सुसुत्रता व पारदर्शकता राहण्यासाठी सर्व वजन काट्यांची अॅक्टीव्ह संगणक प्रणाली एकच असणे व त्यांचे कॅलिब्रेशन नियंत्रण वैधमापन विभागाकडून व्हावे, यासाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जयसिंगपूर येथे ऊस परिषदेत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत वजन काटे ऑनलाईन करणेसाठी एकमुखी ठराव घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here