राज्यात आता ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीचा प्रवास मोफत

0

मुंबई : वयाची ७५ वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास करता येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही घोषणा करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (१६ ऑगस्ट) सांगितलं.

यापूर्वी ६५ वर्षे वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येत होती. परंतु यामध्ये बदल करून आता ७५ वर्षांवरील नागरिकांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे.
१५ ऑगस्ट २०२२ रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना एसटी बसचा प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे. त्यांना तिकिटाचा कोणत्याही स्वरुपाचा दर आकारण्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
<p>यासोबतच राज्य सरकारने इतर तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार यंदा राज्य सरकार गोविदांना विम्याचं कवच देणार आहे. १० लाखांच्या विम्याचं कवच राज्य सरकार गोविदांना देणार आहे. त्याचा प्रिमीयमसुद्धा राज्य सरकार भरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारी यांची घोषणा केली आहे. बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या. तसंच विरोधकांवर टीकासुद्धा केली.

लता मंगेशकर यांच्या नावाने सुरू केलं जाणारं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय २८ सप्टेंबरला लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसंच राज्य सरकारने बुधवारी राज्यभरात सकाळी ११ वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम आयोजित केला आहे.
यावेळी मुख्यंत्र्यांना संतोष बांगर यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी “कायद्यासमोर सर्व समान आहेत. आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत नाही. ते व्हीडिओ तपासले जातील. जर कोणी दोषी आढळले तर कारवाई होईल,” असं आश्वासन शिंदेंनी दिलं.

<p>शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
विरोधकांनी राज्य सरकारला दिलेल्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली आहे.
विरोधकांचं पत्र वाचल्यावर त्यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव दिलाय की काय असंच वाटलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना “जे काम अडिच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होतं. ते आता आम्ही केलं आहे. आम्ही आता दुरुस्ती केली आहे,” असा टोला शिंदेंनी लगावला आहे.
आधीच्या सरकारच्या कामांना स्थगिती दिल्याच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना “अत्यावश्यक सेवेतल्या कुठल्याही कामाला आम्ही स्थिगिती दिलेली नाही. आकसापोटी कुठलाही निर्णय रद्द करणार नाही,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here