फलटण प्रतिनिधी
फलटण येथे राष्ट्रीय किशोर किशोरी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. 29 ऑक्टोबर ते दि. 02 नोव्हेंबर 2022 पर्यंत फलटण येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी फलटण नगरी सज्ज झाली असून त्यासाठी असणारी आवश्यक सर्व तयारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे.
फलटण येथे संपन्न होणाऱ्या किशोर / किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी एकूण 47 संघ भाग घेणार आहेत. त्यामधील 24 संघ किशोर म्हणजेच मुलांचे आहेत तर 23 संघ किशोरी म्हणजेच मुलींचे आहेत. माजी आमदार स्वर्गीय श्रीमंत शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर क्रीडां संकुल येथील मैदानावर सदरील सामने संपन्न होणार आहेत. सदरील क्रीडांगणावर प्रेक्षकांसाठी दहा हजार आसन क्षमता असलेली प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आलेली आहे. यामध्ये पत्रकारांसाठी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया असे कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. यासोबतच गुणलेखक कक्ष व पदाधिकारी कक्ष सुद्धा क्रीडांगणावर उभारण्यात आलेले आहेत.येथे उभारण्यात आलेल्या गॅलरींना स्वर्गीय मा. नगराध्यक्ष अशोकराव देशमुख गॅलरी , स्वर्गीय किरण विचारे गॅलरी, स्वर्गीय विजयकुमार खलाटे गॅलरी, स्वर्गीय विष्णू कुंभार गॅलरी अशी नावे देण्यात आलेली आहेत. यासोबतच संपन्न होणाऱ्या खो खो स्पर्धांच्या भव्य अशा प्रवेशद्वारास स्वर्गीय पी. जी. शिंदे यांचे नाव देण्यात आलेले आहे.
क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या चार मैदानांवर सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यामधील तीन मैदाने ही मातींची असून एक मॅटचे मैदान तयार करण्यात आलेले आहे. सकाळच्या सत्रात 20 सामने आणि सायंकाळच्या सत्रामध्ये एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. सायंकाळच्या सत्रातील सर्व सामने प्रकाशझोतात खेळविण्यात येणार आहेत .सामन्यांमध्ये खेळताना एकूण सहा गट असणार आहेत. त्या सहा गटातून 2 विजेते आणि 2 उपविजेते अशा दोन गटांमध्ये बाद फेरीमध्ये जाणार आहेत. त्यानंतर उपांत्यपूर्व सामना, उपांत्य सामन्या व अंतिम सामना अशा पद्धतीने सामने संपन्न होणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये २ उपांत्य सामने खेळवले जाणार आहेत. त्यामध्ये २ किशोरी म्हणजे मुलांचे तर २ किशोरी म्हणजे मुलींचे सामने संपन्न होणार आहेत. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी साठी सकाळच्या सत्रामध्ये सामना संपन्न होणार आहे. किशोर व किशोरी यांचा अंतिम सामना सायंकाळी मॅट वरील मैदानावर संपन्न होणार आहे.