रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था म्हणून मान्यता मिळणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ भारतातील पहिले कृषि विद्यापीठ

0

राहुरी विद्यापीठ, दि. 28 सप्टेंबर, 2022
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून हवामान
अद्ययावत शेती व पाणी व्यवस्थापन केंद्रामध्ये कृषिसाठी ड्रोनच्या वापरावर प्रयोग करण्यासाठी
प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने ड्रोन नियम 2021
प्रसिद्ध केले आहेत. या नियमावलीनुसार ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलट परवाना आवश्यक
असतो. हा परवाना नागरी विमान वाहतूक संचालनालयाने अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण
संस्थेकडून घ्यावा लागतो. त्यासाठी आता महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरीला अधिकृत ड्रोन
पायलट प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी नागरी विमान उड्डाण महासंचालनालय भारत
सरकार, नवी दिल्ली या कार्यालयाने मान्यता दिली आहे.
नवी दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी नुकतीच
महात्मा फुले कृषि विद्यापीठास भेट दिली. त्यांनी ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापनेकरीता
लागणार्‍या सुविधा आणि मुलभुत संसाधनांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कृषि संशोधन केंद्र,
चास येथील ड्रोन उड्डान क्षेत्राची पाहणी केली. सर्व सुविधांची पडताळणी करुन विमान वाहतुक
संचालनालयाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेसाठी
मंजुरी दिली आहे. कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेसाठी
लागणार्‍या सर्व बाबीसाठी विद्यापीठ सदैव मदत करेल असे आश्वासन दिले. महात्मा फुले कृषि
विद्यापीठाला मंजूर झालेले अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र हे भारतातील कृषि
विद्यापीठातील पहिले व एकमेव केंद्र आहे. या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेसाठी
ग्राउंडझीरो एरोस्पेस, मुंबई यांच्याशी विद्यापीठाने करार केला असून ते ड्रोन पायलट
प्रशिक्षणासाठी मदत करणार आहेत.
या उपक्रमाच्या उभारणीसाठी विद्यापीठाचे तत्कालीन संशोधन संचालक तथा संचालक
विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता शिक्षण संचालक डॉ. प्रमोद रसाळ, कास्ट प्रकल्पाचे
प्रमुख संशोधक तथा विभाग प्रमुख कृषि अभियांत्रिकीचे डॉ. सुनील गोरंटीवार, कास्ट प्रकल्पाचे
सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, यांचे मार्गदर्शन लाभले. कृषि यंत्र व शक्ती विभागाचे विभाग
प्रमुख तथा कास्ट प्रकल्पाचे सदस्य डॉ. सचिन नलावडे, ग्राउंडझीरो एरोस्पेस, मुंबईचे श्री. राहुल
आंबेगावकर व ध्रिती शाह, कास्ट प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. गिरीषकुमार भणगे व तांत्रीक
सहाय्यक इं. नीलकंठ मोरे यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. महात्मा फुले कृषि विद्यापीठ
राहुरी येथील अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेच्या मान्यतेचा कालावधी 10 वर्षे असून मुख्य

कार्यालय महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे राहिल. ड्रोन उड्डाण प्रक्षेत्र व प्रशिक्षण स्थळ
हे कृषि संशोधन केंद्र, चास, जि. पुणे येथे असणार आहे. नागरी विमान उड्डाण महासंचालनालय
या कार्यालयाने निश्चित करून दिलेला रिमोट पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविणे, प्रशिक्षण
पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी पायलटचे मूल्यमापन करणे, अधिकृत रिमोट पायलट प्रमाणपत्र
बहाल करणे ही या रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेचे मुख्य कार्य आहेत. या प्रशिक्षणासाठी पात्रता
10 वी पास असून भारतीय नागरिकत्व असणे आवश्यक आहे अशी माहिती अकाउंटेबल मॅनेजर
व प्रमुख संशोधक डॉ. सचिन नलावडे (संपर्क क्रमांक 9422382049) यांनी दिली.
शेतीमधील ड्रोनची गरज ओळखून, त्यासाठी चांगले प्रशिक्षत ड्रोन पायलट ग्रामीण भागात
तयार झाले तर गावातील तरुणांना ड्रोन हे एक उत्तम रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. नेमक्या
याच भावनेने महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था सुरू
करण्यात येत आहे. या केंद्राद्वारे सर्व अहर्ता प्राप्त इच्छुकांना ड्रोन पायलट बनण्याची संधी
उपलब्ध होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here