आता एका फोनवर सुटेल तुमची समस्या. सातारा : आपल्या देशात रेशन कार्ड Ration card shopkeeper हे अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. स्वस्त दरात धान्य मिळवणे फक्त यापुरताच याचा उपयोग मर्यादीत नसून इतरही अनेक सरकारी कामात रेशन कार्ड उपयोगास येतं. सरकार आपल्या देशातील गरीब गरजू जनतेला रेशन कार्डच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून देत आहे.
देशभरात असलेल्या रास्त भाव दुकानदारांच्या माध्यमातून हे वितरण होत असतं. परंतू, अनेकदा हे वितरक रेशन कार्डधारकांना धान्य देताना गडबड करतात.
दुकानदार धान्य कमी देणे, धान्य कमी देऊन जास्त पैसे घेणे, नवीन रेशन कार्ड बनवून देण्यास टाळाटाळ करणे असे प्रताप करत असतात. त्यामुळे सामान्य नागरिक भरडला जातो. परंतू आता सामन्यांना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे, जर रेशन कार्डवर स्वस्त धान्य मिळवत असताना कोणतीही समस्या उद्भवली, तर तुम्ही याबाबत थेट ऑनलाईन तक्रार करु शकता.
रेशन कार्ड हे अनेकार्थाने महत्त्वाचे आहे. नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवले जाते. मात्र काही रेशन दुकानदार ग्राहकांना वस्तू देण्यास टाळाटाळ करतात. काही वेळा धान्य ज्यादा दराने अन्य दुकानदारांना विकले जाते, असेही प्रताप घडतात. ह्या अशा अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना सामान्यांना करावा लागत असल्याने सरकारने एक ठोस पाऊल उचलले आहे.
सरकारकडून आता प्रत्येक राज्यानुसार रेशन तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही जर रेशन कार्डवर कमी धान्य मिळत असेल किंवा डीलर विरोधात तक्रार असेल, नवीन रेशनकार्डसाठी अडचण निर्माण करत असेल, किंवा अनावश्यक पैशांची मागणी करत असल्यास चिंता करायचे कारण नाही. तुम्ही सरकारच्या टोल-फ्री क्रमांकावर घरबसल्या ऑनलाईन तक्रार करु शकता. ज्या तक्रारीची दखल थेट तहसील कार्यालयाकडून घेतली जाऊन कार्यवाही होईल. तसेच सरकारच्या वेबसाईटवरही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
महाराष्ट्रात रेशन कार्ड संबंधित तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक – 1967 / 1800224950
रेशन संबंधित तक्रारीसाठी ऑनलाईन वेबसाईट – https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx