“वाचनातून विचारशक्ती आणि विचारशक्तीतूनच आत्मविश्वास
येतो”- डॉ. हिरालाल महानुभव

0

कोपरगाव- “वाचनातून विचारशक्ती प्राप्त होते आणि ही विचारशक्तीच माणसाला घडविणारा आत्मविश्वास निर्माण करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन
करावं, विचारांची शक्ती प्राप्त करावी; म्हणजे भविष्यात पदवीनंतर आपण कोण? हे ठरवावेच लागणार नाही. पद व रोजगार प्राप्त होऊन आपोआप व्यक्तिमत्व
घडेल”, असे विचार प्रतिपादन कोपरगाव येथील म.सा.प.कोपरगावचे अध्यक्ष डॉ.हिरालाल महानुभव यांनी केले.
येथील एस.एस.जी.एम. कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम जन्मदिन अर्थात ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
महाविद्यालयात संपन्न झालेल्या या ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आर. आर. सानप तसेच प्रमुख वक्ते
म्हणून म.सा.प.कोपरगावचे कार्याध्यक्ष श्री. राजेंद्रजी कोयटे, म.सा.प.कोपरगावचे कार्यवाह संतोष तांदळे, कवयित्री शैलजा रोहम, यांची विशेष उपस्थिती होती.
राजेंद्र कोयटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना,आपल्या कार्यातून लांबलचक नाव लोकांच्या मनात ठसवणारे डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच दासू वैद्यांच्या कवितेद्वारे आणि ‘स्व’लिखित विडंबन कवितेतून पुस्तके व त्यांच्या वाचनाचे महत्त्व लक्षात आणून दिले. संतोष तांदळे यांनी स्वानुभवांना उजाळा देत पुस्तक वाचनाने होणारे फायदे विद्यार्थ्यांपुढे ठेवले,तर कवयित्री शैलजा रोहम यांनी भगवद्गगीतेतील ज्ञान व कर्मयोग विद्यार्थ्यांनी वाचून,समजून घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सानप यांनी, कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. अब्दुल कलामांचा प्रवास या वाचनामुळे जसा एका नावाड्याच्या मुलापासून तो भारताच्या राष्ट्रपती आणि भारतरत्न अशा सर्वोच्च पदांपर्यंत झाला.तसा आपला होण्याचे धेय्य विद्यार्थ्यांनी ठेवावे. त्यासाठी त्यांचे ‘अग्निपंख’ सारखी पुस्तके वाचावी अशी सूचना केली. कार्यक्रमप्रसंगी कु.पल्लवी पवार, कु.वराडे मानसी, बाविस्कर अभिजीत या विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचनाविषयी आपले अभिप्राय व्यक्त केले. बाविस्कर अभिजीतच्या वक्तव्याने प्रभावीत होऊन डॉ.हिरालाल महानुभव यांनी रोख पाचशे रुपये आणि पुष्पगुच्छ देऊन तर कवयित्री शैलजा रोहम यांनी ग्रंथ भेट देऊन त्याचा सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक,पाहुण्यांचा परिचय याद्वारे प्रा.डॉ बाबासाहेब शेंडगे यांनी वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश स्पष्ट केला. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयातील कला शाखेचे उपप्राचार्य, प्राध्यापक,महाविद्यालयीन अधीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. उज्ज्वला भोर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. छाया शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here