कोळपेवाडी वार्ताहर :-कोपरगाव नगरपरिषदेने चुकीच्या सर्वेच्या आधारावर शहरातील नागरिकांना व व्यावसायिकांना बजावलेल्या वाढीव कराच्या पावत्यांचे वितरण होत असतानाच आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील नागरिक व व्यावसायिकांची संयुक्त बैठक घेऊन झालेल्या चर्चेतून नगरपरिषद प्रशासनाला त्याबाबत खुलासा करण्याचे सांगितले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेतून खाजगी कंपनीकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये चुका झाल्याचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी मान्य करून वाढीव कर कमी होणार असल्याचे नंतरच्या आढावा बैठकीत सांगितले आहे. वाढीव कर हे मोठे आर्थिक संकट होते. कोपरगाव शहरवासियांवर आलेले हे आर्थिक संकट आ.आशुतोष काळे यांच्यामुळे टळले असून नागरिक व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे कोपरगाव व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी सांगितले आहे.
त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, शहरातील नागरिकांच्या मालमत्तेवर वाढीव कर लागू करून कोपरगाव नगरपरिषदेने एक प्रकारचा अन्याय केला होता. त्याची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी तातडीने शहरातील नागरिक व व्यावसायिक संघटनांशी सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत व्यापारी महासंघाचा कार्याध्यक्ष या नात्याने या बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी सकारात्मक विचार करून मुख्याधिकाऱ्यांना वाढीव करपट्टी बाबत खुलासा करण्याच्या सूचना केल्या होत्या. जेणेकरून शहरवासियांच्या मनातील शंका दूर होतील. त्या सूचनेप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांनी झालेल्या सर्वेची माहिती घेतली असता या सर्वेत चुका झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत त्यांनी आ.आशुतोष काळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत त्याबाबत जाहीर खुलासा करून वाढीव कर कमी होणार असल्याचे सांगितले .त्यामुळे निश्चितपणे शहरातील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. तसेच सर्व्हे करतांना ज्या नागरिकांचा चुकीचा सर्व्हे होवून त्यांच्या मालमत्तांवर चुकीचा कर आकारण्यात आला आहे. त्यामध्ये बदल झाल्यांनतर चुकीचा कर कमी होणार आहे. याबाबत आ. आशुतोष काळे यांनी तातडीने भूमिका घेवून ठोस पावले उचल्यामुळे हे शक्य झाले आहे.
कोपरगाव शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यापारी महासंघ नेहमीच अग्रेसर असतो. त्याप्रमाणे वेळोवेळी आपली भूमिका मांडत आला आहे त्याप्रमाणे आ. आशुतोष काळे यांनी घेतलेल्या बैठकीत मी व्यापारी संघाची भूमिका मांडली त्या भूमिकेला आ. आशुतोष काळे व मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कर वाढ करतांना चुका झाल्या आहेत त्याबाबत ज्यांनी हरकती घेतल्या आहेत व ज्यांनी हरकती घेतल्या नाहीत त्या सर्वांच्या सर्वेक्षणातील चुका दुरुस्त करण्याचे मुख्याधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. झालेल्या चर्चेनुसार ज्यांच्या हरकती आहेत व व ज्यांच्या हरकती आल्या नाहीत त्यांच्या देखील चुका दुरुस्त करून देणार असल्याची माहिती देवून सुधारित प्रस्ताव पाठविणार असल्यामुळे कर कमी होणार असल्याचा खुलासा मुख्याधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी घेतलेल्या खंबीर भूमिकेमुळे नागरिकांना चुकीचा वाढीव कर कमी होण्याबाबत मोठा दिलासा मिळाला असल्याचे सुधीर डागा यांनी म्हटले आहे.