विखे पाटील यांच्या हस्ते मृत मुलांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रूपयांच्या मदतीचे धनादेश सुपुर्द 

0

संगमनेर : वीजेचा शॉक लागून  मृत्यू झालेल्या चार मुलांच्या कुटुंबीयांची राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा भेट घेतली. प्रत्येक कुटुंबाला चार लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा धनादेश त्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. जनसेवा फौंडेशनच्या वतीने या कुटुंबाला किराणा साहित्यही देण्यात आले. या कुटूबीयांकरिता घरकुलांचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून आठ दिवसात मंजूरीचे पत्र देण्यात येईल. अशा शब्दात पालकमंत्र्यांनी या कुटुंबांना आश्वस्त केले.

         संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी अंतर्गत असलेल्या वांदरकडा येथील नाल्यात तुटलेल्या वीजवाहक तारेचा धक्का बसून अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे व  विराज अजित बर्डे या चार कुमारवयीन मुलांचा  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे  पाटील यांनी या कुटूबीयांची भेट घेवून त्यांना सर्वेतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. निष्काळजीपणा  करणाऱ्या अधिकाऱ्यांवर  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.चारही मुलांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने तसेच अन्य विभागाकडून मदत मिळावी म्हणून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा पालकमंत्री  विखे पाटील यांनी व्यक्तिगत पाठपुरावा केला होता. वीज वितरण कंपनीने मंजूर केलेले प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश या कुटुंबांना आज पालकमंत्र्यांच्या हस्ते अकलापूर येथे देण्यात आले. अन्य योजनेतील धनादेशही लवकरच या कुटुंबाला  दिले जातील. असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ चे कीट ही या कुटुंबीयांना देण्यात आले. यावेळी संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, वीजवितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्यासह अँड.बापुसाहेब गुळवे,अँड.श्रीराम गणपुले, जावेद जहागिरदार, डाॅ.सोमनाथ कानवडे, सतिष कानवडे, अमोल खताळ,  किशोर डोके, जनार्दन आहेर, राहूल भोईर, संजय देशमुख, साहेबराव वलवे उपस्थित होते.

पालकमंत्री विखे- पाटील म्हणाले की, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये निष्काळजीपणा कारणीभूत ठरला. परंतू, या कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. सरकार संवेदनशील असल्यामुळेच मदतीचे धनादेश तातडीने दिले गेले. अन्य मदत मिळण्यासाठी व्यक्तिगत पाठपुरावा करणार असून घरकुलांचे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी देण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here