सातारा/अनिल वीर : प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी वेगवेगळे कला गुण असतात.-हेच कलागुण शिक्षकांना ओळखता आले पाहिजेत. असे प्रतिपादन शिरीष चिटणीस यांनी केले.
येथील औद्योगिक वसाहतीमधील लोकमंगल हायस्कूलमधील विद्यार्थिनी तनुजा जगताप हिने अनंत इंग्लिश स्कूल येथे आयोजित केलेल्या कै. गौतम बोधे चित्रकला स्पर्धेत अक्षरलेखन विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने तिचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. तेव्हा संस्थेचे सर्वेसर्वा शिरीष चिटणीस मार्गदर्शन करीत होते.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा कृष्णानगरचे संचालक व उत्कृष्ट चित्रकार पी.बी. तारू, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे सचिव अनिल चिटणीस व मुख्याध्यापिका नंदा निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
चिटणीस म्हणाले, “विद्यार्थी शाळेत आल्यानंतर विविध भाषेत शिकत असतो. शाळेमध्ये खेळ, चित्रकला, नाट्यकला व भाषणात तो सहभागी होत असतो. शाळेमध्ये असणाऱ्या विविध विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या वेगवेगळ्या कला शिक्षकांना समजल्या तर त्या विद्यार्थ्यांची योग्य स्पर्धेसाठी निवड होऊ शकते. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तो आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो. आपल्या विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम चालवले जात आहेत.”
पी.बी.तारू म्हणाले,”ग्रामीण भागात असणारी शाळा चित्रकला स्पर्धेत उज्वल यश मिळवत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. या विद्यार्थ्यांना वेगळे मार्गदर्शन नसतानाही ते चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत.” यावेळी तनुजा जगतापचा सत्कार करण्यात आला. सफारच्या कार्यक्रमास कलाशिक्षक अभिजीत वाईकर, बाळकृष्ण इंगळे आदींची उपस्थिती होती. प्रदीप लोहार यांनी सूत्रसंचालन केले.गुलाब पठाण यांनी आभारप्रदर्शन केले.
फोटो : शिरीष चिटणीस पुस्तक भेट देताना शेजारी मान्यवर.(छाया-अनिल वीर)