विमानतळाचा निर्णय डिसेंबर अखेर घेतला नाही तर निवडणुकांवर बहिष्कार : डॉ.भारत पाटणकर

0

सातारा/अनिल वीर : जिल्ह्यातील कराड जवळ विस्तारित होणाऱ्या विमानतळास संबंधित शेतकऱ्यांचा विरोध आहे.त्यामुळे मंत्रालयात बैठक बोलावुन अंतिम निर्णय डिसेंबर अखेर घेतला नाही तर आगामी होणाऱ्या लोकसभा – विधानसभावर निवडणुकांवर बहिष्कार परिसरातील गावे टाकणार आहेत.असा निर्वाणीचा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी दिला आहे.

                येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कराड विमानतळ विस्तार विरोधी कृती समितीच्यावतीने आयोजित करण्यात आले होते.तेव्हा डॉ. पाटणकर मार्गदर्शन करीत होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी तडाखेबाज भाषणे करून घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

     “जनतेच्या प्रदीर्घ आणि पर्याय देणाऱ्या तीव्र विरोधामुळे कराड विमानतळ विस्ताराचा विस्मृतीत गेलेला प्रकल्प गेल्या अधिवेशनात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे पुढे आणला गेला. आपण यावेळी जनतेच्या विरोधाचा उल्लेख केला असूनसुद्धा असा विरोध नसल्याचे आमदार महोदयांकडून सांगितले गेले. त्यामुळे जनतेचा आजही सकारात्मक विरोध आहे. हे सांगण्यासाठी आणि सातारा जिल्ह्याला उपयोगी ठरू शकणाऱ्या पर्यायी जागेवर विमानतळ उभारण्याचा मुद्दा पुढे आणण्यासाठी आपल्याबरोबर बैठक आयोजित करावी.सन २०१२ सालापासून सुरू असलेल्या जनतेच्या संघर्षाच्या कालखंडात झालेल्या मंत्रालय ते जिल्हा पातळीवरील बैठकांची नेमकी वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडणे.आजच्या ठिकाणी असलेल्या कराड विमानतळाच्या विस्तारातून सातारा जिल्ह्याचा विकास किंवा कोयना धरणाच्या बाबत आणीबाणी उद्भवल्यास तातडीने तिथे पोहोचण्याची सोय होण्याबाबत शास्त्रीयदृष्ट्या विचार केल्यास हा विस्तार कुचकामी असल्याचे आम्ही अनेक मार्गानी सिद्ध केले आहे. त्या ऐवजी पुमेगाव, ता. खटाव शेजारी शेतीलायक नसलेल्या जमिनीवर मोठे विमानतळ केल्यास दोन्ही हेतू साध्य होतील. हेसुद्धा दाखवून दिले आहे. या पायावर आणि बेकायदा संपादन प्रक्रिया असण्याच्या पायावर सकारात्मक संघर्ष केल्यामुळेच हा विस्तार करण्याचे काम सुरू झाले नव्हते. या सर्व प्रक्रियेची माहिती आमदार पृथ्वीराज चव्हाण महोदयांना असूनही ती लपवून ठेवून त्यांनी खोटी माहिती दिली आहे.आम्ही या पत्रासोबत पूर्वीचा सर्व पत्रव्यवहार आपल्या माहितीसाठी जोडला आहे. आपण मुख्यमंत्री असण्याच्या काळातलाही हा पत्रव्यवहार आहे. आपल्या सरकारमधील विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार अजित (दादा) पवार यांनाही हा विषय यापूर्वी अवगत केला आहे. त्यामुळे आमच्या पर्यायाचा विचार करून खन्या अर्थाने उपयोगी ठरणारा विमानतळाचा प्रस्ताव विचारात घेऊन हा विषय मार्गी लावावा. असे आवाहन आपल्याला करीत आहोत. तेव्हा सकारात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू कराल आणि पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही. अशी खात्री व्यक्त करीत आहोत.” अशा आशयाचे निवेदन आंदोलकांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे डॉ.भारत पाटणकर यांच्यासह चंद्रकांत पाटील, सिद्धेश्वर पाटील, विनायककराव शिंदे,महेश शिंदे,आनंदराव जमाले,पंजाबराव पाटील,शब्बीर मूजावर,भास्कर पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here