विमा कंपनीने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के पिक विमा नुकसान भरपाई द्यावी; कोपरगाव तालुका भाजपची मागणी 

0

कोपरगाव : (वार्ताहर) दि. २१ ऑक्टोबर

              कोपरगावसह संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असे असतानाही विमा कंपनीने शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देऊन त्यांची बोळवण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स व अन्य विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व सर्व शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार विजय बोरुडे यांच्याकडे केली आहे.अन्यथा उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दिवाळीसणाच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये विमा कंपनी विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष आहे.

            याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, दीपक चौधरी, डॉ. राजकुमार दवंगे, हरिभाऊ लोहकणे, संदीप देवकर, अण्णासाहेब शिंदे, सुदाम करपे, किसनराव गव्हाळे, वसंतराव मिस्त्री, बाळासाहेब सोनवणे, चंद्रभान आढाव, संदीप चौधरी, गणेश थोरात, श्रीकांत वहाडणे, अनिल चौधरी, दिनेश थोरात, महेश थोरात, नानासाहेब थोरात, जगदीश थोरात, बाबासाहेब महाले, संदीप गुसळे, संदीप थोरात, बाळासाहेब थोरात, योगेश वाकचौरे, दीपक सुरे, वसंतराव गायकवाड, राजेंद्र सखाहरी परजणे, आदी उपस्थित होते. 

         या निवेदनाच्या प्रती तालुका कृषी अधिकारी आणि एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी, जिल्हाधिकारी तसेच अन्य विमा कंपनीच्या व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत. चालू वर्षी पावसाळ्यात कोपरगाव शहरात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे, सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, कांदा, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने पिके सडून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली खरिपांसह अन्य पिके यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पिकांच्या नुकसानीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. 

          कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी सह अन्य पिक विमा कंपन्यांकडे वेगवेगळ्या पिकांचा विमा उतरवून विम्याची रक्कम भरलेली आहे. पाऊस किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा हमखास मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती; परंतु परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या खरीप व इतर पिकांचे १०० टक्के नुकसान झालेले असतानाही एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी सह अन्य पिक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईची अत्यल्प रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. 

          शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी जी रक्कम भरली, त्यापेक्षाही अत्यंत तुटपुंजी रक्कम नुकसान भरपाई म्हणून देऊन शेतकऱ्यांची बोळवण करून क्रूर चेष्टा केली आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीप्रमाणे पूर्णत: १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबू, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

फोटो ओळी

          एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्शुरन्स व अन्य विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व सर्व शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार विजय बोरुडे यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here