विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने जनार्दन आहेर यांची पदावरून उचल बांगडी – अमर कतारी

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे पाटील

भाजपच्या कूटनीतीमुळेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. तसेच भाजप विरोधी पक्ष असताना या पक्षाच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून जनार्दन आहेर बसतात ही बाब  सर्व शिवसैनिकांना आणि पक्षामधील वरिष्ठ नेत्यांना खटकली. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांची तालुका प्रमुख पदावरून उचल बांगडी करण्यात आली असून त्यांची हकालपट्टी झालेली नाही. अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

          यावेळी बोलताना अमर कतारी म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच काम खरोखर चांगल आहे. मात्र विरोधकांच्या मांडीला मांडी लावून ते बसत होते. विरोधकांच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी तालुक्यामध्ये त्यांच्यासोबत ते फिरत होते. त्यामुळे त्यांची फक्त पदावरून उचल बांगडी झाली. त्यांनी  शिवसेनेमध्ये राहून अजूनही जर चांगली कामे केली तर निश्चितपणे त्यांना न्याय मिळेल. शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांचे काम शिवसेनेमध्ये खरोखरच चांगले आहे. त्यांनी अनेक सामाजिक कार्य केली आहेत. गोरगरीब जनतेला विशेष करून पठार भागाला नेहमी त्यांनी न्याय मिळवून दिला. मात्र  जनार्दन आहेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख असताना देखील भाजपाचे महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड, खासदार सदाशिव लोखंडे यांच्याशी असलेली त्यांची जवळीक त्यांना नडली. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून त्यांच पद पक्षश्रेष्ठींनी काढून घेतले आहे. विरोधी पक्षाचे विशेषतः ज्या भाजपामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले त्या पक्षाच्या नेत्यांच्या संगमनेर तालुक्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे ही बाब  सर्व शिवसैनिकांना आणि पक्षामधील वरिष्ठ नेत्यांना खटकली. त्यामुळे त्यांची तालुका प्रमुख पदावरून उचल बांगडी करण्यात आली आहे. तसेच त्यांनी दोन वर्षांपूर्वीच तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची कुठलीही तक्रार नसेल असे सांगत कतारी पुढे म्हणाले की त्यांनी शिवसेनेमध्ये राहून चांगलं काम केल तर निश्चितपणे त्यांना भविष्यात न्याय मिळेल. नूतन तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे यांच्यावर शिवसेनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक केसेस आहेत. कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेना ठाकरे गटात तुमच्याकडे किती पैसा आहे, किती प्रॉपर्टी आहे हे पाहत नाहीत तर निष्ठा पाहिली जाते. त्यामुळे निष्ठावंत सैनिकाला शिवसेनेत न्याय मिळतो. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम माजी मंत्री तथा संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांनी केले आहे. नवीन पदाधिकाऱ्यांना घेऊन जोमात काम करू आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात गद्दारांना धडा शिकवून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणु. शिवसेनेत राहून आता जे गद्दारी करतील त्यांना फटके देऊन टाकू. आता फटकायचीच वेळ आली आहे. फक्त नेतृत्वाने पाठीवर हात ठेवायला हवा. बाकीच्यांना आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेऊ असेही अमर कतारी यावेळी म्हणाले.

चौकट :- नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवरून संपर्कप्रमुख बबनराव घोलप यांच्या विरोधात संगमनेरात संताप व्यक्त करण्यात आला. ज्या निवडी झाल्या आहेत. त्या सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांना विश्वासामध्ये घेऊन झाल्या नाहीत. त्यामुळे जनार्दन आहेर यांच्यावर एक प्रकारे अन्याय होत आहे. आहेर यांनी नेहमी लोकहिताची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळाला पाहिजे. झालेल्या नवीन निवडीचा पुनर्विचार करून सर्व शिवसैनिकांना विश्वासामध्ये घेऊन पुन्हा निवडी कराव्यात अशी मागणी माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्या समर्थनासाठी तालुक्यातील रायतवाडी फाटा येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख ॲड. दिलीप साळगट, माजी तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक कैलासशेठ वाकचौरे,युवा सेना प्रमुख गुलाब भोसले,  दीपक खेमनर, रवींद्र गिरी, पप्पू कानकाटे, अमोल कवडे, सोमनाथ काळे, युवराज गुंजाळ, संतोष कुटे, संदीप गुंजाळ, गणेश डोंगरे, गणेश परचांडे, श्रीपाद पवार, नवनाथ भोसले आदीसह बहुसंख्य शिवसैनिक हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here