वैदुवाडीत बहुमतात बाटली राहिली उभी ;  दारूबंदी ठरावाच्या विरोधात अधिक मतदान       

0

संगमनेर : संगमनेर खुर्द परिसरातील वैदुवाडी मध्ये दारूबंदी करण्यात यावी यासाठी काल शुक्रवारी मतदान घेण्यात आले मात्र दारूबंदीच्या ठरावाच्या विरोधात अधिक मतदान झाले. त्यामुळे वैदुवाडीत बाटली आडवी होण्याऐवजी बाटली जिंकली. त्यामुळे दारूबंदीच समर्थन करणाऱ्या नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वेळी प्रकरणातील तक्रारदाराने अचानक माघार घेतल्याने या तक्रारदाराविरुद्ध उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.                 संगमनेर खुर्द परिसरातील वैदुवाडीमध्ये   दारूबंदी करावी व यापुढे ग्रामपंचायतीने कोणालाही दारू विक्रीचा परवाना( ना हरकत दाखला) देऊ नये यासाठी  वैदूवाडी मधील ग्रांमस्थ आक्रमक झाले आहेत.यासाठी काल शुक्रवारी  संगमनेर खुर्द मध्ये ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या ग्रामसभेत दारूबंदीच्या ठरावा संदर्भात मतदान घेण्यात आले. ठरावच्या विरोधात  २०० तर बाजूने १८५ मतदान झाले. ग्रामस्थांनी या मतदानामध्ये उत्साहात सहभाग घेतला. किरकोळ वादावादी वगळता मतदान पार पडले. मात्र मतमोजणीत बाटली आडवी होण्याऐवजी तब्बल १५ मतांनी जिंकत दिमाखात उभी राहिली. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.संगमनेर खुर्द परिसरात अनेक देशी-विदेशी दारूचे दुकाने असल्याने या गावातील तरुण व्यसनाधीन झालेले आहेत. यामुळे ग्रामपंचायतीने गावामध्ये पूर्ण दारूबंदी करावी अशी मागणी  भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जगन्नाथ  मच्छिंद्र शिंदे यांनी केली होती. याबाबत सरपंच व ग्रामसेवकांना त्यांनी निवेदन दिले होते .  काल अचानक शिंदे यांनी  घुमजाव केले. आपण दारूबंदीचा गैरसमजुतीने अर्ज केला होता. आपले या मागणी संबंधी शंका निरसन झाल्याने आम्ही दारूबंदी विषयाचा अर्ज व मागण्या मागे घेत असल्याचे त्यांनी ग्रामसेवकांना पत्र देऊन चक्क या प्रकरणी माघार घेतली. आणि त्यानंतर झालेल्या मतदानातही बाटली १५ मताने जिंकली. त्यामुळे संगमनेर खुर्दच्या वैदुवाडीत दारूबंदी ठरावाचा निव्वळ फार्स ठरला. 

चौकट  :- न्यायालयात धाव घेणार – शिंदे              संगमनेर खुर्द परिसरातील वैदुवाडी मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये दारूची विक्री होऊ देणार नाही. दारूबंदीच्या विरोधात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त मतदान केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक माघार घेतल्याने त्याचे खरे कारण सर्वांना माहिती आहे. दारूबंदीच्या विरोधात गरज पडल्यास न्यायालयात जाऊ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here