शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदावरून जनार्दन आहेर यांना हटवले ; भाऊसाहेब हासे नवे तालुका प्रमुख

0

संगमनेर / चंद्रकांत शिंदे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संगमनेर तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहेर यांची अनपेक्षितपणे तालुकाप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवे तालुकाप्रमुख म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे यांची वर्णी लागली असून अजूनही काही तालुका पातळीवर काम करत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना लवकरच पदमुक्त केले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. दरम्यान उपजिल्हाप्रमुख पदावर मुजीब शेख यांची वर्णी लागली आहे.

           गेल्या कित्येक दिवसापासून शिवसेनेत असणारी गटबाजी लपून राहिली नव्हती. परिणामी संगमनेर शहर आणि संगमनेर तालुका संघटनेत कुठेही समन्वय दिसत नव्हता. त्यामुळे शिवसैनिक सैरभैर झाले होते. या काळात शिवसैनिकांनी खुद्द पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख माजी मंत्री बबनराव घोलप तसेच जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्याकडे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर दोन वर्षापूर्वी जनार्दन आहेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र तो वरिष्ठांनी स्वीकारला नव्हता.  तशातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यावर राज्यात शिवसेनेचे दोन गट पडले. मात्र संगमनेर शहर आणि तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे सोबत राहिले. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाचे राजकीय द्वंद विकोपाला गेले असताना संगमनेरचे तालुकाप्रमुख मात्र भाजप नेते राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या संपर्कात राहत असल्याची बाब काही शिवसैनिकांना खटकत होती. ही बाब काही शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या लक्षात आणून दिल्यावर खेवरे यांनी पक्षाच्या संगमनेर येथील बैठकीत तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांना याबाबत समजही दिली होती. त्यानंतर गत महिनाभरापूर्वी पठार भागातील नांदूर खंदळमाळ परिसरात असणाऱ्या वांदरकडा येथे दोन भावांच्या चार मुलांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. त्यावेळी जनार्दन आहेर यांनी राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री असणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन करून त्या कुटुंबाची भेट घडवण्यात मोलाचा सहभाग घेतला होता. तसेच आठ दिवसापूर्वी पठार भागात असणाऱ्या रणखांब फाटा येथे युवा सेनेने एसटी बससाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेले खासदार सदाशिव लोखंडे यांची उपस्थिती होती. ही बाब शिवसैनिकांना खटकली होती. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद शिगेला पोहोचला होता. त्यामुळे या सर्व गोष्टी पुराव्यासह शिवसैनिकांनी  वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातल्या होत्या. त्याचा परिपाक  गेल्या कित्येक दिवसांची तालुका आणि शहर शिवसेनेत असलेली जनार्दन आहेर यांच्या बाबतची खदखद अखेर काल त्यांच्या तालुका प्रमुख पदाच्या गच्छंतीने काही प्रमाणात शमली असली तरी भविष्यात भाजप आणि शिंदे गटाच्या छुप्या संपर्कात असणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या लवकरच पदावरून उचल बांगड्या होणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. दरम्यान संगमनेर शहर प्रमुखपदी अमर कतारी यांची पाचव्यांदा निवड करण्यात आली असून उपनगर शहर प्रमुखपदी प्रसाद पवार यांची पुन्हा वर्णी लागली आहे. उपजिल्हाप्रमुख पदी मुजीब शेख आणि शिर्डी लोकसभा जिल्हा संघटक पदी आप्पाशेठ केसेकर यांची निवड करण्यात आली आहे.

चौकट :- नवीन तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे आणि नवीन उपजिल्हाप्रमुख मुजीब शेख यांना सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी जोमाने काम करणार असल्याचे सांगत, पक्षाने जो निर्णय घेतला आहे. जो मान सन्मान दिला आहे. त्यामुळे मी पक्षाचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी दिली. 

चौकट :-  पद जातात येतात. त्यामुळे टेन्शन घ्यायचं कारण नाही. विखे पाटलांशी जवळीक नाही, मात्र वांदरकडा येथील आदिवासी कुटुंबातील चार मुलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. विखे पाटील पालकमंत्री असल्याने त्यांना त्या कुटुंबाला भेटण्यासाठी बोलावले व आदिवासी कुटुंबाला लाभ मिळवून दिला ही काय चूक केली का ? असा सवाल करत घारगावचे पोलीस स्टेशन इतरत्र हलवण्याचा घाट प्रस्तापित नेत्यांनी घातला होता. मात्र विखे पाटलांच्या पाठबळावर तो थांबवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. मला पदावरून काढण्याचा काही लोकांनी घाट घातला होता त्यात त्यांना यश आले. मात्र मी नाराज नाही. नवीन तालुकाप्रमुखांनी चांगलं काम कराव यासाठी शुभेच्छा आहेत. असे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here