मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.
मुंबई महापालिकेनं ठाकरेंना दसरा मेळाव्यास परवानगी नाकारल्याचा आदेश कोर्टाने रद्द ठरवला आहे.
दसरा मेळाव्याच्या सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (23 सप्टेंबर) सुनावणी झाली.
यावेळी निकाल देताना हायकोर्टानं शिंदे गटाला दणका दिला. सदा सरवणकर यांनी शिंदे गटातर्फे दाखल केलेली हस्तक्षेप याचिका कोर्टानं फेटाळून लावली.
न्यायालयानं निकाल देताना म्हटलं, “उद्धव ठाकरेंना पालिकेच्या अटी मानाव्या लागतील. ठाकरेंना २ ते ६ ऑक्टोबर शिवाजी पार्क वापरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याचिकाकर्ता जबाबदार राहतील.”
शिवसेना नेते काय म्हणाले?
हायकोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला आहे.
शिवसेना नेते अनिल परब यांनी म्हटलं, “कोर्टानं आम्हाला दसरा मेळावा कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे. महापालिकेचे आक्षेप फेटाळले आहेत. यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेकडून अतिशय जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला जाईल. कोर्टाच्या सगळ्या अटींचं पालन आम्ही करू.”
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं, “न्यायालयानं जो निर्णय दिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. आतापर्यंत कधीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. आता न्यायालयानं परवानगी दिली आहे. सगळ्या नियमांचं आम्ही पालन करणार आहोत.”
याआधी काय घडलं?
याआधी मुंबई महानगरपालिकेने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांना शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारली होती. दोन गटाकडून परवानगीसाठी अर्ज आल्याने आम्ही पोलिसांचा अभिप्राय मागवल्याचं पालिका प्रशासनाने म्हटलं होतं.
शिंदे गटाचे अर्जदार आमदार सदा सरवणकर यांच्या अर्जाला उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेने म्हटलं होतं, ‘कायदा आणि सुव्यवस्था यादृष्टीने आम्हाला पोलिसांचा अभिप्राय हवा होता. त्यानुसार शिवाजी पार्क पोलीस स्टेशनने म्हटलंय की, कोणत्याही एका अर्जदाराला परवानगी दिल्यास शिवाजी पार्क संवेदनशील परिसरात कायदा,सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. हा पोलिसांचा अभिप्राय पाहता तुमचा परवानगी अर्ज आम्ही नामंजूर करत आहोत.’
दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पालिकेच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचे वकील म्हणाले, “आम्हाला आज बीएमसीची नोटीस मिळाली आहे की, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून आम्ही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी देऊ शकत नाही. आम्ही याला चॅलेंज करत आहोत.”
उद्धव ठाकरेंचे वकील काय म्हणाले?
आज शुक्रवार 23 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडताना सांगितलं, “दसरा मेळावा शिवसेनेकडून गेले कित्येक वर्षापासून घेतला जातो. यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाते, अनिल देसाई दरवर्षी मागणी करतात. यावेळी 20 दिवस आम्हाला उत्तर मिळालं नाही. त्यामुळे आम्ही याचिका दाखल केली. सदा सरवणकर यांनी एक अर्ज दिला. त्यामुळे परवानगी नाकारली. हे योग्य कारण नाही.
“कायदा सुव्यवस्था सरकारचा प्रश्न आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावं. हे कारण देत माझा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. दसरा मेळाव्याला कधीच खंड पडला नाही. यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल हे कारण अत्यंत चुकीचं आहे. 2016 चा सरकारचा आदेश आम्हाला परवानगीसाठी पुरेसा आहे. “
यावर इतर कोणालाही त्याची परवानगी मिळू नये असं त्या आदेशात लिहिलं आहे, असा प्रश्न कोर्टाने विचारल्यावर ठाकरे यांच्या वकिलांनी नाही असं उत्तर दिलं. सदा सरवणकर यांची याचिका नामंजूर करावी, असं ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं,.
मुंबई महानगरपालिकेचे वकील काय म्हणाले?
पालिकेतर्फे युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी “हे मैदान शांतता क्षेत्रात मोडतं, ते खेळाचं मैदान आहे. त्यामुळे कायद्याला अनुसरुन आम्ही परवानग्या नाकारल्या आहेत, असं सांगितलं. तसेच कोणालाच मला हीच जागा हवी असं म्हणण्याचा अधिकार नाही. इथं मेळावा झाल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा अहवाल आल्यामुळे परवानगी नाकारली”, असं पालिकेच्या वकिलांनी स्पष्ट केलं.
एखाद्या जागेवर कुणीही आपला कायम हक्क सांगू शकत नाही, तुमच्या एकत्र येण्यावर, भाषण करण्याच्या अधिकारावर गदा आणलेली नाही, असं पालिकेनं कोर्टात सांगितलं.
गणपती दरम्यान दोन्ही गटांकडून दादर भागात बॅनर लावण्यात आले होते. यामुळे दोन्ही गटात वाद निर्माण झाला आहे. असं पत्र पोलिसांनी मुंबई महापालिकेला दिलं होतं. पालिकेने हे बॅनर काढून टाकण्यास पोलिसांना सांगितलं होतं, असंही महापालिकेच्या वकिलांनी सांगितलं.
शिंदे गटाचे वकील म्हणाले…
शिदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे वकील यांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटलं की, “अनिल देसाईंची याचिका माझ्या अपरोक्ष दाखल करण्यात आली. त्यांच्याशिवाय दुसरा कोणता गट नाही असं गृहीत धरून ही याचिका दाखल केली.
“आता उद्धव ठाकरेंचं सरकार नाही. त्यांचं सरकार गेलं आहे. मला या याचिकेत एक पक्ष बनवण्यात यावा ही माझी मागणी आहे. मी आता सरकारमध्ये आहे. माझी याचिका शिवसेनेकडून आहे. सद्य स्थितीत राज्यात शिवसेना सत्तेत आहे. मला पक्षातून काढून टाकण्यात आलेलं नाही. मी पक्षाचा आमदार आहे.”