संगमनेर : तू जास्त शहाणा व गावचा बाप झाला का असे म्हणून तिघांनी एकाला शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपी पैकी एकाने फिर्यादीला चाकूने दुखापत केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे घडली. या प्रकरणी सरपंचासह संगमनेर शेतकी संघाच्या संचालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रामदास कारभारी दिघे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात म्हटले आहे की बाबासाहेब प्रभाकर कांदळकर, सचिन रामनाथ दिघे आणि मतीन चांदभाई शेख सर्व (रा.तळेगाव दिघे) यांनी मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१० वाजेच्या सुमारास फिर्यादी रामदास दिघे हे घराकडे जात असताना तळेगाव दिघे येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गट ऑफिस समोर वरील आरोपींनी संगनमत करून तू जास्त शहाणा व गावचा बाप झाला आहे का ? आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देतो का ? असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करून धक्काबुक्की करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आरोपी सचिन दिघे यांनी त्यांच्या हातातील चाकूने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कांबीवर चाकू मारून दुखापत केली. यानंतर फिर्यादी त्याचे घरात गेला असता वरील आरोपींनी फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने घुसून फिर्यादी व फिर्यादीची पत्नी व भावजई यांना शिवीगाळ करून फिर्यादीच्या हाताला धरून तू बाहेर चाल तुझे तुकडे तुकडे करतो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामदास कारभारी दिघे यांनी शुक्रवार दि. ७ ऑक्टोबर रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ४२६ /२०२२ भा.द.वी कलम ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड करत आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपी बाबासाहेब प्रभाकर कांदळकर हे तळेगाव दिघेचे सरपंच असून सचिन रामनाथ दिघे हे संगमनेर शेतकी संघाचे विद्यमान संचालक आहेत.