देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या मदतीत वाढ करुन तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून क्रांतीसेनेकडुन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आलेल्या सर्व मागण्यांचा विचार विनिमय करून तात्काळ सोडवणुक करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पत्राद्वारे आवाहन करुन आपण शेतकऱ्यांनी आत्महत्या करू म्हणून शिवछत्रपतींची शपथ घातली, शेतकऱ्यांनी आपला तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नये… आत्महत्या करू नये… मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या अस्मानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे, असे पत्रात नमूद केले. त्यामुळे आपल्या शुभहस्ते शेतकर्यांचे विविध समस्या सोडविल्या जाऊन कल्याण होईल, अशी आशा निर्माण झाली.
अशातच आपल्या राज्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर निसर्गाने कहर केला. मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतल्या. यामुळे शेतकरी वर्गाची ही दिवाळी अंधकारमय झाली. परतीच्या मुसळधार पावसाने थैमान घातले. काढणीला आलेल्या पिकांबरोबरच कापुस पिके अक्षरक्षः पाण्यात न्हाऊन निघाली. पांढर्या सोन्याला मोड फुटुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निसर्गाच्या प्रकोपाने हातातोंडाशी आलेला घास गेला. हे विकून चार पैसे मिळवून दिवाळी साजरी करण्याचे पाहिलेल्या स्वप्नावर पाणी फिरले. त्यामुळे दिवाळी लख्ख प्रकाशात साजरी होण्याऐवजी अंधकारमय साजरी करण्याची वेळ शेतकरी राजावर आली. गेल्या तीन चार दिवसांपासून विरोधी पक्षाचे नेतेमंडळी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून सरसकट पंचनामे करावेत, एकरी ५० हजार रूपये मदतीची सरकारकडे मागणी करु लागले आहेत. आपले सरकार एकरी ५० हजार नुकसान भरपाई देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केलेली नाही. मात्र महागाईच्या काळात रात्रंदिवस मेहनत घेऊन पिकांवर केलेला खर्च तरी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम वाढवून हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी. शेतकरी बांधवांना फक्त पत्राद्वारे आधाराची गरज नाही तर ठोस अशा मदतीची गरज आहे.
" चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया ! "
आपण शेतकऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातील छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नवनिर्माण करण्यासाठी शेतकरी बांधव ही कटीबद्ध आहेत. फक्त क्रांतीसेनेकडुन मुख्यमंत्री कार्यालयास पाठविण्यात आलेल्या सर्व समस्यांवर विचार विनिमय होऊन त्या तातडीने सोडविण्याची गरज आहे, अशा मागणीसह हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे, उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, प्रभाकर म्हसे, मच्छिंद्र पेरणे, सुरेशराव म्हसे, सचिन म्हसे, कडु म्हसे, बाबासाहेब माळवदे, पोपट म्हसे, भाऊसाहेब पवार, पोपट म्हसे, शरद म्हसे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, जालिंदर शेडगे, बाबासाहेब चेडे, रंगनाथ माने, जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, नवनाथ ढगे, विठ्ठल शेजुळ, अविनाश कुरूमकर, संदीप उंडे, संदीप डेबरे, शब्बीर शेख, शेखर पवार, बाळासाहेब भोर, शाम कदम, सोमनाथ वने, अंकुश भोसले आदींनी केली आहे.