श्री. ग. र. औताडे विद्यालयाला ६० लाख रुपये देणार – आ. आशुतोष काळे

0

पद्मभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.ग. र. औताडे विद्यालयात प्रयोगशाळा वाढल्यामुळे वर्ग खोल्या कमी पडत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना येत असलेल्या अडचणी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे. सर्वच विद्यार्थी एकाच वेळी शिक्षण घेवू शकतील त्यासाठी नवीन वर्ग खोल्या बांधण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ६० लाख रुपये देणार असल्याचे रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यानी सांगितले.

पोहेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. ग. र. औताडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभुषण डॉकर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पद्मभुषण डॉकर्मवीर भाऊराव पाटील यांनी वाड्या वस्त्यावर, बहुजनांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने कर्मवीर शंकररावजी काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाढीसाठी तन मन धनाने प्रयत्न करून रयत शिक्षण संस्थेचे राज्यासह जिल्ह्यात जाळे विणून कष्टकरी, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांचा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी देखील पुढे चालविला. हाच वारसा पुढे चालवितांना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाची मला जबाबदारी दिली, दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून मी देखील कर्मवीरांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून तनमनधनाने रयत शिक्षण संस्थेच्या भरभराटीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. पोहेगाव व परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी श्री.ग. र. औताडे विद्यालयाचे काम समाधानकारक असून विद्यालयाला सर्वोतोपरी मदत करू अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here